
सामना ऑनलाईन। पाटणा
लव्ह गुरू म्हणून प्रसिद्ध असलेले बिहारमधील प्राध्यापक मटुकनाथ चौधरी सध्या दुसऱ्या ज्युलीच्या शोधात आहेत. त्यांनी सोशल साईटवर स्वत:च याबद्दल सांगितलं आहे. बुधवारी सेवानिवृत्त झाल्यानंतर मटुकनाथ यांनी फेसबुकवर एक पोस्ट टाकली. या पोस्टला त्यांनी ‘चढती जवानी मेरी चाल मस्तानी’ असं शीर्षक दिलं. त्यात मी आज सेवानिवृत्त झालो असून दुसऱ्या ज्यूलीच्या शोधात असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
मटुकनाथ बारा वर्षापूर्वी आपल्याहून 30 वर्ष लहान असलेल्या ज्युली नावाच्या विद्यार्थिनीच्या प्रेमात पडले होते. त्यानंतर दोघांनी लग्न केले. पण वर्षभरापूर्वी ज्युलीने संन्यास पत्करला व ती मटुकनाथ यांना सोडून गेली. तेव्हापासून ते एकटेच राहत आहेत. पाटणा विश्वविद्यालयात हिंदीचे प्राध्यापक असलेले मटुकनाथ 40 वर्षानंतर बुधवारी सेवानिवृत्त झाले. पण त्यानंतर त्यांनी फेसबुकवर एक पोस्ट टाकली. या पोस्टला त्यांनी ‘चढती जवानी मेरी चाल मस्तानी’ असं शीर्षक दिलं. त्यात मी 65 वर्षांचा तरुण असून अजूनही माझ्या अंगात तारुण्य सळसळत असल्याचं त्यांनी म्हटलं. माझ्या या तारुण्याला लोकांची नजर लागते. जेव्हा मी धावतो तेव्हा लोकं बघतच राहतात. मी भाग्यवान आहे जो 65 व्या वर्षी ऐन तारुण्याच्या उन्माद काळात सेवानिवृत्त झालो. आता मला फक्त मौज मस्ती करायची आहे. पण त्यासाठी मला दुसरी ज्युली हवी आहे. जिच्याबरोबर मी प्रेमसंबंध ठेवू शकतो. असंही मटुकनाथ यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. त्याचबरोबर माझ्याबरोबर लग्न करण्यासाठी तरुणींच्या रांगा लागल्या आहेत. पण त्यातून माझ्यासाठी योग्य अशा तरुणींची निवड फक्त माझे विद्यार्थी करणार आहेत. सध्या तरुणींचे पालक मला फार त्रास देत असल्याचही मटुकनाथ यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.
मटुकनाथ यांच्या या पोस्टनंतर पुन्हा एकदा नेटकऱ्यांनी त्यांना लक्ष्य केलं आहे. कोणी त्यांना त्यांच्या वयाच भान ठेवण्याचा सल्ला दिला आहे. तर कोणी त्यांची अक्कल काढली आहे. पण मटुकनाथ यांना मात्र दुसरी ज्युली शोधण्याची घाई आहे.

























































