
योगगुरू बाबा रामदेव (Ramdev) यांच्या पतंजली फूडसमध्ये (Patanjali Foods) गुंतवणूक करणाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. शेअर बाजाराने (Share Market) कंपनीच्या प्रवर्तक समूहातील 29.258 कोटी शेअर्स गोठवले आहेत. कंपनी निर्धारित वेळेत किमान सार्वजनिक शेअर होल्डिंगचे (Minimum Public Float Norm) निकष पूर्ण करण्यात अयशस्वी ठरल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. ‘द इकोनॉमीक टाइम्स’ने याबाबत वृत्त दिले आहे.
वृत्तानुसार, पतंजली फूड्समधील पब्लिक शेअरहोल्डिंग डिसेंबर अखेरीस 19.18 टक्के होती. सेबीच्या नियमांनुसार, कोणत्याही सूचीबद्ध कंपनीमध्ये किमान 25 टक्के सार्वजनिक भागधारक असणे आवश्यक आहे.
सेबीच्या नियमांनुसार, जर एखाद्या कंपनीत सार्वजनिक शेअरहोल्डिंग 25 टक्क्यांपेक्षा कमी असेल, तर ती तीन वर्षांत 25 टक्क्यांच्या पातळीपर्यंत वाढवावी लागेल. पतंजली फूड्सने मार्च 2022 मध्ये सार्वजनिक ऑफरवर फॉलो आणला होता. याद्वारे 6.62 कोटी शेअर्स जारी करण्यात आले. यामुळे कंपनीतील सार्वजनिक भागभांडवल 19.18 टक्क्यांवर पोहोचले. मात्र त्यानंतर कंपनीने ते 25 टक्क्यांपर्यंत नेण्यासाठी कोणतीही पावले उचललेली नाहीत. त्यामुळे शेअर्स गोठवण्यात आले आहेत.
ही देखील वाचा – हप्त्यांमध्येही जमा करू शकता पैसे; ‘या’ एफडीवर मिळतो चांगला परतावा
पतंजली फूड्स पूर्वी रुची सोया इंडस्ट्रीज म्हणून ओळखले जात होते. डिसेंबर 2017 मध्ये, NCLT ने त्याविरुद्ध दिवाळखोरीची कारवाई सुरू केली. जुलै 2019 मध्ये, न्यायाधिकरणाने पतंजली आयुर्वेदाच्या संकल्प योजनेला मंजुरी दिली. रिझॉल्युशन प्लॅनच्या अंमलबजावणीनंतर, कंपनीतील सार्वजनिक शेअरहोल्डिंग 1.1 टक्क्यांपर्यंत खाली आले होते.
छप्परफाड परतावा देणारा म्युचुअल फंड; प्रत्येक 3 वर्षांनी दुप्पट होते रक्कम…
पतंजली आयुर्वेदाचा कंपनीत सर्वाधिक 39.4 टक्के हिस्सा आहे. कंपनी सेबीचे नियम पूर्ण करेपर्यंत हे शेअर्स गोठवले जातील. पतंजली फूड्सचा शेअर बुधवारी NSE वर वाढला होता, परंतु गुरुवारी मात्र हा शेअर जवळपास 4 टक्क्यांनी पडला आणि बातमी लिहीपर्यंत 927वर स्थिरावला होता.

























































