
पैठण येथील राजपूत समाजाने पित्याचे अंत्यसंस्कार मुलींच्या हस्ते करुन एक आदर्श पायंडा पाडला आहे. भगतसिंग चौहान या दिवंगत पित्याचे सर्व अंतिम संस्कार मुलींनी विधीवत पार पाडून कृतीशील स्रीपुरुष समानता अधोरेखित केली आहे.
परदेशीपुरा भागातील ज्येष्ठ नागरिक भगतसिंग चौहान (73) यांचे आज अल्प आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, 6 विवाहित मुली, भाऊ, जावयी व नातवंडे असा परिवार आहे. दरम्यान परदेशीपुरा येथील पंजिकृत राजपूत पंच कमिटी व महाराणी पद्मावती महिला मंडळ यांनी तातडीची बैठक घेऊन हा ऐतिहासिक निर्णय घेतला. त्यानुसार तिरडी समोर हंडी धरण्यापासून ते स्मशानात पार्थिवाला अग्निडाग देण्यापर्यंत सर्व धार्मिक विधी भगतसिंग यांच्या मुली लीना विजयसिंग परदेशी, हेमा राजेश परदेशी, वर्षां शिवप्रसाद परदेशी, पूनम गोवर्धन टाक, गौरी उमेश भारतवाले व राणी रिंकू परदेशी यांनी पार पाडले. सर्व जावयी व समाजबांधव यांनी या बदलास पाठिंबा दिला.




























































