विद्यालयीन तरुणींच्या छेडछाडी विरोधात पाथर्डीत आंदोलन

विद्यालयीन तरुणींची काही तरुणांनी छेड काढल्याने संतप्त झालेल्या येथील एम. एम. निऱ्हाळी विद्यालयातील विद्यार्थिनी, विद्यार्थी व शिक्षकांनी मंगळवारी पोलीस स्टेशनवर मोर्चा काढत छेडछाड करणाऱ्या तरुणांना अटक करा, अशी मागणी केली. या घटनेत छेडछाड करणाऱ्या तरुणांना विरोध करणाऱ्या एका विद्यार्थ्यास सुद्धा मारहाण झाल्याने व एका शिक्षकास दमदाटी झाल्याने आंदोलनात सहभागी झालेले विद्याथी चांगलेच आक्रमक झाले होते.

मंगळवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास एम. एम. निऱ्हाळी विद्यालयातील काही विद्यार्थिनींची शहरातीलच युसूफ पठाण, इरफान पठाण यांच्यासह दुचाकीवरून  आलेल्या चार ते पाच तरुणांनी या विद्यालयातील काही तरुणींची छेडछाड केली. हा प्रकार चालू असतानाच याच विद्यालयात शिकत असलेला विद्यार्थी अक्षय शिरसाठ याने छेडछाड करणाऱ्या तरुणांना जाब विचारला असता त्याला छेडछाड करणाऱ्या विदयार्थ्यांनी विद्यालयाच्या आवारात जाऊन मारहाण केली. ही मारहाण सोडवण्यासाठी एक शिक्षक गेले असता त्यांना सुद्धा छेडछाड करणाऱ्या तरुणांनी  दमदाटी केली. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या विद्यालयातील सर्व विद्याथी व शिक्षकांनी थेट पोलीस स्टेशनवर मोर्चा काढत पोलीस स्टेशनच्या आवारातच धरणे आंदोलन सुरू केले.

या वेळी बोलताना विद्यालयातील शिक्षक के. एन. नरोटे म्हणाले कि, विद्यालयात येणाऱ्या विद्यार्थिनींची काही टारगट तरुण नेहमीच छेडछाड करतात. या पूर्वी पोलिसांकडे तक्रार दाखल करूनही उपयोग झाला नाही. शाळा भरतेवेळी व सुटतेवेळी ठराविक तरुण मोटारसायकल वर येतात व मुलींची छेडछाड करतात. आज ज्या तरुणांनी छेडछाड केली त्यांना अटक केल्याशिवाय आम्ही माघारी जाणार नाही.

काजल लोखंडे या विद्यर्थिनीने, आम्ही रोज होणाऱ्या छेडछाडीला कंटाळलो असून ताबडतोब या तरुणांचा बंदोबस्त करा, अशी मागणी केली.

विद्यालयाचे प्राचार्य दिलीप गोरे म्हणाले की, काही गुंड विद्यालयाच्या आवारात येऊन मुलींची छेडछाड करतात. विरोध केला तर आम्हालाच दमदाटी केली जाते. या तरुणांचा बंदोबस्त केल्याशिवाय माघार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

या आंदोलनाला पोलीस निरीक्षक रमेश रत्नपारखी सामोरे गेले व त्यांनी या प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करु, असे आश्वासन दिले मात्र आंदोलन मागे घेण्यास आंदोलकांनी नकार दिला. या नंतर सर्व आंदोलकांशी पुन्हा एकदा रमेश रत्नपारखी यांनी चर्चा केल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

या आंदोलनात विद्यालयातील शिक्षक  श्रीकांत निऱ्हाळी, एम. पी. आव्हाड, किशोर पडोळे, बाळासाहेब ढाकणे, कृष्णा आंधळे, शिवाजी बडे, दिलीप राजळे, छाया निऱ्हाळी, अपर्णा शेटे, किसन आव्हाड हे सहभागी झाले होते.

या संदर्भात अक्षय शिरसाठ याच्या तक्रारीवरून पोलिसांनी युसूफ पठाण, इरफान पठाण व इतर सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून सायंकाळी उशिरा पर्यंत या प्रकरणातील एकाही आरोपीला अटक करण्यात आली नव्हती.

आपली प्रतिक्रिया द्या