10 दिवसात 164 कोटी भरा, नाहीतर…; ‘त्या’ जाहिरातींवरून AAP ला नोटीस, सिसोदियांची भाजपवर सडकून टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
arvind-kejriwal

अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला (AAP) राजकीय जाहिराती सरकारी संदेश म्हणून दिल्याबद्दल 10 दिवसांच्या आत ₹ 163.62 कोटी भरण्यास सांगितले आहे. दिल्ली महानगरपालिका (एमसीडी) निवडणुकीत ‘आप’ने 15 वर्षांनंतर भाजपला पराभूत केल्यानंतर दिल्लीतील सत्तासंघर्ष वाढला. आता ‘आप’ राजधानीत राज्य सरकार आणि नागरी संस्था या दोन्हींचे प्रमुख आहे.

माहिती आणि प्रचार संचालनालयाने (DIP) जारी केलेल्या वसुलीची नोटीसमधून ‘आप’ला 31 मार्च 2017 पर्यंत जाहिरातींवर खर्च केलेल्या ₹ 99.31 कोटींची परतफेड करण्यास सांगण्यात आला. उर्वरित ₹ 64.31 कोटी या रकमेवर दंड आहे.

नायब राज्यपाल व्हीके सक्सेना यांनी पूर्वी दिलेल्या इशाऱ्याचा हवाला देत अधिकाऱ्यांनी माहिती दिली की, ‘आप’ पैसे भरण्यात अयशस्वी झाल्यास, त्याचे दिल्लीतील कार्यालय आणि इतर मालमत्ता सील केल्या जाऊ शकतात.

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या पक्षाला लक्ष्य करण्यासाठी नायब राज्यपाल आणि भाजपने दिल्ली सरकारमधील अधिकाऱ्यांचा गैरवापर केल्याचा आरोप ‘आप’कडून करण्यात आला आहे.

उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी सांगितले की, ‘भाजप हे ‘आप’चे सरकार आणि मंत्र्यांना लक्ष्य करण्यासाठी दिल्लीच्या अधिकाऱ्यांचा उघडपणे गैरवापर करत आहे. त्यांनी सरकारी सेवा विभागांवर ताबा मिळवला आहे आणि ते आमच्या विरोधात अधिकाऱ्यांचा वापर करत आहेत’.

‘दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना लक्ष्य करण्यासाठी अधिकाऱ्यांचा गैरवापर करणे थांबवा आणि आम्हाला काम करू द्या’, असे सिसोदिया म्हणाले.

दिल्लीतील आप विरुद्ध केंद्र संघर्षाचा हा नवा अध्याय सुरू झाला आहे. दिल्लीचे नायब राज्यपाल हे भाजपच्या आदेशानुसार काम करत आहेत आणि दिल्ली सरकारला प्रत्येक टप्प्यावर जाणूनबुजून अडवतात, असा ‘आप’चा आरोप आहे.

20 डिसेंबर रोजी, लेफ्टनंट गव्हर्नर सक्सेना यांनी आपच्या विरोधात कारवाई सुरू केली होती आणि सरकारी जाहिरातींच्या नावाखाली राजकीय जाहिराती चालवल्याचा आरोप केला होता.

आपचे मुख्य प्रवक्ते सौरभ भारद्वाज यांनी नायब राज्यपालांच्या आदेशाला ‘नवं प्रेमपत्र’ अशा खोचक शब्दात टीका करत फेटाळून लावलं.

‘आम्ही राष्ट्रीय पक्ष बनलो आहोत आणि एमसीडीमध्ये सत्ता मिळवली याचा भाजपला धाक आहे. एलजी साहेब सर्व काही भाजपच्या निर्देशानुसार करत आहेत आणि त्यामुळे दिल्लीतील लोकांना त्रास होत आहे. दिल्लीची जनता जितकी चिंतीत असेल तितका आनंद भाजपला मिळतो’, अशी गंभीर टीकाही भारद्वाज यांनी केली.