डॉ. पायल तडवी आत्महत्याप्रकरण; आरोपी डॉक्टरांना हायकोर्टाकडून जामीन मंजूर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

नायर रुग्णालयातील डॉ. पायल तडवी हिच्या आत्महत्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या डॉ. हेमा आहुजा, डॉ. भक्ती मेहेर आणि डॉ. अंकिता खंडेलवाल यांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला. आरोपी डॉक्टरांविरोधात चार्जशीट दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे या आरोपींना जामीन देण्यास आमचा विरोध नाही, असे राज्य सरकारने स्पष्ट करताच न्यायमूर्ती साधना जाधव यांनी प्रत्येकी दोन लाखांच्या हमीपत्रावर डॉक्टरांचा जामीन मंजूर केला. हा खटला पूर्ण होईपर्यंत तीनही डॉक्टरांचे वैद्यकीय परवाने स्थगित करावेत, असे आदेशही न्यायमूर्तींनी मेडिकल काऊन्सिलला दिले. दरम्यान, तब्बल 72 दिवसांनंतर या डॉक्टरांची तुरुंगातून सुटका होणार आहे.

नायर रुग्णालयातील डॉ. पायल हिच्या आत्महत्याप्रकरणी आग्रीपाडा पोलिसांनी आरोपी डॉक्टरांवर रॅगिंग तसेच ऍट्रॉसिटी कायद्याखाली गुन्हा दाखल केला आहे. या तिघीही तुरुंगात असून त्यांनी आपल्या सुटकेसाठी हायकोर्टात अर्ज केला आहे. न्यायमूर्ती साधना जाधव यांच्यासमोर याप्रकरणी सुनावणी घेण्यात आली. सुनावणीवेळी विशेष सरकारी वकील राजा ठाकरे यांनी बाजू मांडताना कोर्टाला सांगितले की, या आरोपींविरोधात चार्जशीट दाखल करण्यात आली आहे. त्यांना आता जामीन देण्यास काहीच हरकत नाही. सरकारचा हा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायमूर्तींनी तिघींचा जामीन अर्ज मंजूर केला. सत्र न्यायालयाच्या परवानगीशिवाय या तिघींनी शहराबाहेर जाऊ नये तसेच नायर रुग्णालयाच्या आवरातही या तिघींनी पाय ठेवू नये, अशी ताकीद न्यायालयाने दिली.

न्यायालय काय म्हणाले?

  • रुग्णालयातील प्रत्येक विभागप्रमुखांनी शिकाऊ डॉक्टरांची काळजी घेतली पाहिजे. ही त्यांची डय़ुटी आहे.
  • ही डय़ुटी बजावण्यात विभागप्रमुख अपयशी ठरले.
  • या प्रकरणामुळे ग्रामीण भागातील किती विद्यार्थी तुमच्या महाविद्यालयात प्रवेश घेतील?
  • हुशार विद्यार्थ्यांना तुम्ही ढ म्हणून कसे काय बोलू शकता?