मेहबुबा मुफ्तींच्या विरोधात इम्रान यांचं बंड, पीडीपी फूटणार?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाइन । श्रीनगर

जम्मू-कश्मीरमध्ये दहशतवादाला रोखण्यात अयशस्वी ठरल्यानंतर भाजपने पीडीपीला दिलेला पाठिंबा काढून घेतला आणि मुफ्ती सरकार पडले. पण सत्तागेल्यानंतर आता पीडीपीमध्ये वाद सुरू झाले असून पक्ष फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पीडीपीचे आमदार इम्रान यांनी थेट मेहबुबा मुफ्ती यांच्यावर परिवार वादाचा आरोप करत पक्षाला ‘खुदा-हाफिज’ म्हटलं आहे.

मेहबुबा मुफ्ती यांनी पक्षात प्रवेश केल्यानंतर लगेचच पक्षावर आपली पकड मजबूत केली आणि आपल्या कुटुंबीयांना अधिकाधिक लाभ मिळवून देण्याचाच विचार केला. या परिवारवादामुळेच हा पक्ष आणि संपूर्ण कश्मीर उद्ध्वस्त झाला, असा गंभीर आरोप इम्रान रझा अन्सारी यांनी केला आहे.

इथे आमचा जीव गुदमरला जात आहे. त्यामुळे तुम्हाला आम्ही ‘खुदा हाफिज’ केला आहेस असं अन्सारी म्हणाले. आम्ही आमदार असल्यामुळे इथे अडकून पडलो होतो. मात्र आता स्वतंत्रपणे निवडणुकांना सामोरे जाण्यास आम्ही तयार आहोत, असं त्यांनी ठणकावून सांगितलं. आम्हाला जनतेची सेवा करायची आहे. त्यामुळे ५० पक्ष बदलावे लागले तरी बेहत्तर, असं म्हणत त्यांनी अन्य पक्षात जाण्याचे संकेतही दिले.

मेहबुबा यांनी पीडीपीला केवळ पक्ष म्हणून मान खाली घालायला लावली असं नाही तर त्यांचे वडील मुफ्ती मोहम्मद सईद यांनी पाहिलेली स्वप्नं देखील तोडली आहेत, असा आरोपही त्यांनी यावेळी केला. तुमचेच नातेवाईक तुमच्या सरकारला खड्ड्यात घालतील, असा इशारा अनेकदा सांगूनही त्यांनी त्याकडं दुर्लक्षं केलं, असंही ते म्हणाले. दरम्यान, इम्रान अन्सारी यांच्यासह अन्य काही आमदारांचा देखील त्यांना पाठिंबा असल्याचं बोललं जात आहे.