
प्रचंड प्रदूषण त्यातच नोकऱ्यांच्या नावाखाली भूमिपुत्रांची होत असलेली पिळवणूक यामुळे वडखळच्या जेएसडब्ल्यू कंपनीविरोधात पेणवासीयांमध्ये संताप खदखदत आहे. अशातच आता कंपनी कोक ओव्हन या प्रकल्पाचे विस्तारीकरण करण्यात येणार आहे. दरम्यान यासंदर्भात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ 22 ऑगस्ट रोजी जनसुनावणी घेणार आहे. मात्र या प्रकल्पाला भूमिपुत्रांनी कडाडून विरोध केला असून 22 ऑगस्टच्या जनसुनावणीत हरकतींचा पाऊस पाडण्याचा निर्धार केला आहे.
1991 साली निप्पॉन डेंड्रो नावाने स्थापन झालेल्या जेएसडब्ल्यू कंपनीचा महाकाय विस्तार झाला आहे. या कंपनीसाठी व्यवस्थापनाने कवडीमोल भावाने जमिनी संपादित केल्या आहेत. नोकऱ्या मिळतील या आशेने डोलवीसह परिसरातील गावांनी आपल्या पिकत्या जमिनी कंपनीच्या घशात घातल्या. परंतु कंपनीने नेहमीच स्थानिकांना नोकरभरतीत डावलले आहे. ज्या भूमिपुत्रांना नोकऱ्या दिल्या त्यातील अनेकांना जाणीवपूर्वक कंपनीच्या कर्नाटक राज्यातील बेल्हारीच्या प्लॅण्टमध्ये बदली करण्यात आली आहे. या छळछावणीविरोधात आवाज उठवूनही व्यवस्थापन जाणीवपूर्वक कानाडोळा करीत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. अशातच वाढत्या प्रदुषणाविरोधातही नेहमीच आंदोलने केली जातात. मात्र व्यवस्थापन जाणीवपूर्वक कानाडोळा करीत असून प्रदूषण नियंत्रण मंडळही थातूरमातूर कारवाई करून गप्प बसत असल्याने संताप व्यक्त होत आहे.
प्रदूषण नियंत्रण मंडळाची जाहिरात
प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे कोक ओव्हन प्रकल्पाच्या विस्तारीकरणाचा प्रस्ताव सादर झाला आहे. त्यानुसार एमपीसीबीने वर्तमानपत्रांमध्ये जाहिरात देऊन 22 ऑगस्ट रोजी जनसुनावणी बोलावली आहे. 30 दिवसांत कोक ओव्हनविरोधात हरकती असल्यास लेखी म्हणणे मांडण्यास सांगितले आहे. दरम्यान या जाहिरातीची माहिती मिळताच पेणमधील भूमिपुत्र, पर्यावरणप्रेमी संस्थांनी संताप व्यक्त केला असून जेएसडब्ल्यू कंपनीच्या वाढत्या प्रदुषणाने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे असा आरोप समाज संस्थेचे अध्यक्ष संदीप म्हात्रे यांनी केला आहे.