पेण तालुक्यात जनता कर्फ्यूला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
फाईल फोटो

कोरोना विषाणूचा प्रसार व संसर्ग रोखण्याकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या नागरिकांना जनता कर्फ्यूच्या आवाहनाला पेण तालुक्यातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. पेण शहरासह तालुक्यातील सर्व रस्ते निर्जन झाले असून नागरिकांनी स्वतःहून घरातून बाहेर न पडणे पसंत केले आहे.

शहरातील नेहमी गजबजलेले असलेले रेल्वे स्टेशन व एसटी स्टँडसुद्धा निर्जन झाले होते. रस्त्यावर केवळ पोलीस, सफाई कामगार त्याचप्रमाणे वृत्तसंकलना करिता बाहेर पडलेले मोजके पत्रकार यांच्या व्यतिरिक्त कोणीही दिसत नव्हते. पेण तालुक्यात असलेलीजेएसडब्ल्यू या कंपनीत सुद्धा शुकशुकाट पसरला होता. या कंपनीत दररोज हजारो कामगार कामाकरिता येत असतात. परंतु आज मात्र कंपनीची जेटी, कामगार कॉलनी व गोवा गेट निर्जन दिसत होते. पेण पोलीस, पेण नगरपालिका, पेण प्रांत कार्यालय, तहसील कार्यालय यांनी नागरिकांना कोणतीही अडचण होऊ नये, याची दक्षता घेतली आहे. तसेच पंतप्रधानांनी केलेल्या जनता कर्फ्यूला नागरिकांनी घरातच राहून साथ देण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.