मोटर वाहन विभाग कर्मचाऱ्यांनी केले लेखणी बंद आंदोलन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । सिंधुदुर्गनगरी

आकृतीबंध व कार्यालयीन रचना करताना राज्य संघटनेने सादर केलेल्या प्रस्तावाचा परिवहन आयुक्त कार्यालयाकडून विचार केला नसल्याचा आरोप करत संघटनेच्या प्रस्तावाचा विचार व्हावा या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज (१ फेब्रुवारी रोजी) महाराष्ट्र राज्य मोटार वाहन विभाग कर्मचारी संघटनेच्यावतीने राज्यभर लेखणी बंद आंदोलन छेडण्यात आले. याचाच एक भाग म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातीलही मोटार वाहन विभाग (आरटीओ) कर्मचारी यांनी लेखणी बंद आंदोलनात सहभागी होत कामकजावर बहिष्कार टाकला. तसेच आरटीओ कार्यालयासमोर उभे राहून विविध घोषणा देत शासनाचे लक्ष वेधले.

मोटार वाहन विभाग (आरटीओ) कर्मचारी संघटना सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष सिध्देश्वर घुले यांच्या नेतृत्वाखाली मोटार वाहन विभाग कर्मचाऱ्यांनी आज लेखणी बंद आंदोलन करत कामकाजावर बहिष्कार टाकला. तसेच आरटीओ कार्यालयासमोर उभे राहून हमारी यूनियन हमारी ताकद, हम सब एक है आदि विविध घोषणाही दिल्या. यावेळी अजय तारवळे, गणेश कारंडे, मंगेश गायकवाड, स्वप्निल मोडकळे, राधा बसवनकर, श्रावणी मयेकर, संजय केरकर आदि कर्मचारी उपस्थित होते.

राज्यातील परिवहन विभागातील कर्मचाऱ्यांच्या आकृतीबंध व कार्यालयीन रचना या महत्वाच्या मागण्या शासनस्तरावर प्रलंबित असल्याने वर्ग ३ च्या कर्मचाऱ्यांच्या भवितव्यास धोका निर्माण झाला होता. त्यामुळे या विभागातील कर्मचाऱ्यांचा आकृतिबंध व कार्यालयीन रचना कशी असावी याबाबत राज्यस्तरीय संघटनेने १६ डिसेंबर २०१६ रोजी प्रशासनाकडे प्रस्ताव सादर केला होता. त्यावर तत्कालीन परिवहन आयुक्तांशी राज्य संघटनेची चर्चाही झाली होती. मात्र शासनाने तो सादर करताना संघटनेचा प्रस्ताव विचारात घेतला गेला नसल्याने ५ ऑक्टोंबर २०१७ रोजी ठिय्या आंदोलन करण्याचा ईशारा या संघटनेने दिला होता. त्यानुसार परिवहन आयुक्तांशी झालेल्या चर्चेत सुधारीत प्रस्ताव सादरण्याच्या सुचनेनुसार आंदोलन स्थगित करत राज्य संघटनेने सुधारीत प्रस्ताव सादर केला होता. मात्र ११ सप्टेंबर २०१८ रोजी परिवहन आयुक्त कार्यालयाने आकृतीबंध व कार्यालयीन रचना बाबत शासनाकडे पाठविलेल्या प्रस्तावात राज्य संघटनेने सादर केलेल्या प्रस्तावाचा विचार केला गेला नसल्याचा आरोप करत राज्य मोटार वाहन विभाग कर्मचारी संघटनेने ३ जानेवारी रोजी राज्यभर ठिय्या आंदोलन केले होते. मात्र त्या आंदोलनाची दखल न घेतल्याने राज्यातील मोटार वाहन विभागा कर्मचारी संघटनेने आज राज्यव्यापी लेखणी बंद आंदोलनाची हाक दिली होती. त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मोटार वाहन विभाग (आरटीओ) कर्मचाऱ्यांनी लेखणी बंद आंदोलन करत कामकाजावर बहिष्कार टाकला. दरम्यान बांदा येथे आरटीओच्या चेकपोस्ट येथील कर्मचारीही या आंदोलनात सहभागी झाले आहे.

….मात्र जनतेची गैरसोय नाही : शिंदे
मोटार वाहन विभाग (आरटीओ) कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी आज एक दिवसीय लेखणी बंद आंदोलन करत कामकाजावर बहिष्कार टाकला आहे. याबाबत उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना विचारले असता उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अशोक शिंदे म्हणाले की, या आंदोलनाचा कार्यालयीन कामकाजावर त्याचा परिणाम झाला आहे. मात्र या आंदोलनामुळे जनतेची कोणत्याही प्रकारची गैरसोय झाली नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.