
सामना प्रतिनिधी, पेण
मुंबई-गोवा महामार्गावरील पेण येथील उड्डाण पुलाची नव्याने बांधण्यात आलेली संरक्षण भिंत धोकादायक झाली आहे. त्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. पेण येथील रेल्वे स्टेशन समोरील उभारण्यात येत असणाऱ्या उड्डाण पुलाची संरक्षण भिंत धोकादायक बनली आहे. सदर भिंतीला बसवलेल्या सिमेंटच्या प्लेटस् बाहेरील बाजूला झुकल्याने या भिंतीना धोका निर्माण झाला आहे. सदरचे सिमेंटच्या प्लेटस् पडून मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
जून महिन्यात पावसाळा सुरू व्हायच्या अगोदरच रेल्वे स्टेशन समोरील उड्डाण पूल उभारण्यासाठी घाई, गडबडीने मातीचा भराव टाकून पूल सुरू करण्यात आला. या गडबडीमुळे पेणमध्ये आत शिरण्याचा मार्ग बंद झाल्याने सर्वच प्रवाशांना 3 किलोमीटर अंतरावरून तरणखोप पूलाजवळून पेणमध्ये चालत यावे लागत असल्याने मोठी अडचण निर्माण होत आहे. कांदळेपाडा ते वडखळ या उड्डाणपुलाचे व पेण येथी उड्डाण पुलावरील महामार्गावर जागोजागी खड्डे पडले आहेत. खड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा हेच समजत नसल्याने पेण ते वडखळ या 6 किलोमिटर अंतराच्या प्रवासाला गाडीने 2 तास वेळ लागत आहे. तरणखोप ते रामवाडी व कांदळेपाडा ते वडखळ असे दोन पूल नव्याने बांधण्यात आले असून या पुलांचे बांधकाम अतिशय निकृष्ट दर्जाचे असल्याने या पुलांवर रस्त्यांऐवजी हजारो खड्ड्यांचे साम्राज्य आहे. त्यामुळे अजून किती प्रवाशांना अपघातात जीव गमवावा लागेल असा सवाल संतप्त प्रवासी करीत आहे
मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरी करणाच्या कामाला 2011 साला पासून सुरुवात करण्यात आली. आज 8 वर्षे होऊनही महामार्गाचे काम पूर्ण न झाल्याने प्रवाशांना व नागरिकांना वाहतुकीचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अनेक ठिकाणची रखडलेली उड्डाणपूल भरावाची कामे, निकृष्ट दर्जाचे बनलेले रस्ते त्यामुळे निर्माण होत असलेले खड्डे यामुळे प्रवाशांना प्रवास करणे डोकेदुखी ठरत आहे. घाई गडबडीमध्ये उरकण्यात येत असलेल्या कामांमुळे उड्डाण पुलाच्या कामात धोके निर्माण होत आहे.



























































