इंदिरा नगरात आठ दिवस पाणी पुरवठा न झाल्याने संतप्त नागरिकांचा पालिकेवर मोर्चा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । पाथर्डी

शहराच्या इंदिरा नगर भागात गेल्या आठ दिवसांपासून पाणी पुरवठा होत नसल्याने संतप्त झालेल्या तेथील नागरिकांनी पालिका कार्यालयावर मोर्चा काढत पालिकेचे पदाधिकारी व पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांना धारेवर धरले. नगराध्यक्ष डॉ. मृत्युंजय गर्जे यांनी दिलेल्या आश्वासनानंतर मोर्चा विसर्जीत करण्यात आला.

या बाबत अधिक माहिती अशी कि, इंदिरा नगर विभागात रोजंदारी करणारे अनेक मजूर राहत असून कामानिमित्त ते दिवसभर बाहेर असतात. या विभागात गेल्या आठ ते दहा दिवसांपासून पालिकेने पाणी पुरवठा न केल्याने आज तेथील नागरिकांनी पालिका कार्यालयावर मोर्चा काढला. मोर्चात दिलीप मिसाळ, उस्मान शेख, अशोक मोहेकर, शिवनाथ शेवाळे, संगीता पाथरकर, सिंधूबाई करपे, अश्विनी गळंगे, संगीता दारुणकर, शकुंतला काकडे,हिना बेग,संगीता खारगे,सुवर्णा कोकणे,दिलीप पानखेडे आदी नागरिक सहभागी झाले होते. आम्ही मोलमजुरीची कामे करत असल्याने दिवसभर आम्हाला घराबाहेर राहावे लागते. आम्हाला जो पाणीपुरवठा केला जातो तो कमी दाबाने व पुरेशा प्रमाणात केला जात नसून गेल्या आठ दिवसांपासून तर आम्हाला पाणी दिले गेले नाही. सध्या कडक उन्हाळा असल्याने पाण्यासाठी आम्हाला दाहीदिशा फिरावे लागत आहे. या ठिकाणची पाईपलाईन नादुरुस्त झाली असून ती सुरु करण्यासाठी जर पालिकेकडे कर्मचारी नसले तर आम्ही काम करून हि पाईप लाईन दुरुस्त करु. तातडीने आमचा प्रश्न सोडवा अन्यथा आम्ही येथून हलणार नाही अशी भूमिका आंदोलकांनी या वेळी घेतली. या आंदोलनाला नगराध्यक्ष डॉ. मृत्युंजय गर्जे हे सामोरे गेले व त्यांनी शहरात सध्या पिण्याच्या पाण्याची अडचण नसून इंदिरा नगर विभागातील पाईप लाईन हि जुनी झाली असल्याने तांत्रिक अडचण निर्माण होत आहे. तातडीने पाईप लाईनची दुरुस्ती करून हा प्रश्न मार्गी लावला जाईल असे आश्वासन गर्जे यांनी दिल्या नंतर आंदोलन मागे घेण्यात आले.