शिवरायांना माफीवीर म्हणणाऱ्या भाजपविरोधात राज्यभरात ‘जोडे मारो’! शिवप्रेमी जनतेचा संताप; नाशिकमध्ये धोतर जाळले, ठिकठिकाणी निदर्शने

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

छत्रपती शिवाजी महाराजांनी पाच वेळा पत्र पाठवून औरंगजेबाची माफी मागितली होती, असे विखारी उद्गार काढणारे भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी आणि शिवाजी महाराज हे तर जुनेपुराणे आदर्श असे अवमानकारक विधान करणारे भाजपचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याविरुद्ध महाराष्ट्र पेटून उठला आहे. चांद्यापासून बांद्यापर्यंत आज आंदोलनाचा भडका उडाला. ठिकठिकाणी रस्त्यावर उतरत शिवप्रेमी जनतेने भाजपचा धिक्कार केला. कुठे जोडे मारो आंदोलन करण्यात आले, तर कुठे धोतर जाळून निषेध नोंदवण्यात आला.

कोश्यारींचे धोतर फेडा, 1 लाख 51 हजार मिळवा!

राज्यपाल कोश्यारींचे धोतर फेडणाऱयास 1 लाख 51 हजारांचे बक्षीस शिवसेनेचे सोलापूर जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांनी जाहीर केले आहे. तर पुण्यात राष्ट्रवादीचे संदीप काळे यांनी बॅनर लावत कोश्यारींचे धोतर फेडणाऱयास एक लाखाचे बक्षीस देण्याची घोषणा केली.

राज्यपालांना पदमुक्त करा

राज्यपालांनी यापूर्वीही शिवरायांचा एकेरी उल्लेख केलेला आहे. महात्मा फुलेंबाबतही त्यांनी असेच विधान केले होते. हे जाणूनबुजून होत आहे का, यामागे त्यांचा काही हेतू आहे का हे तपासले पाहिजे, अशी तीव्र प्रतिक्रिया शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी दिली. शिवरायांवरील विधानाबद्दल राज्यपालांनी माफी मागितली पाहिजे तसेच पंतप्रधान किंवा राष्ट्रपतींनी त्यांना पदमुक्त केले पाहिजे, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली. मी अनेक राज्यपाल बघितले, मात्र असे राजकीय राज्यपाल कधीच पाहिले नाहीत, असेही ते म्हणाले.