
सामना ऑनलाईन, पुणे
दर दोन-तीन वर्षांनी हेल्मेटसक्तीचे भूत पुणेकरांच्या माथी मारण्याचा प्रयत्न होतो. नवीन पोलीस आयुक्त आले की ते पुणेकरांना छळण्याचा निर्णय घेतात. हेल्मेटसक्तीचा निर्णय कोणताही विचार न करता, तसेच कायद्याची पायमल्ली करून घेण्यात आला आहे. पुणेकरांना स्वतःच्या जिवाची काळजी आहे. त्यामुळे कारण नसताना हेल्मेटचे भूत पुणेकरांच्या माथी मारू नका, अशा शब्दांत हेल्मेटसक्तीविरोधी कृती समितीने हेल्मेटसक्तीचा विरोध केला.
पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी १ जानेवारीपासून पुण्यात हेल्मेटसक्ती करण्याचा आदेश दिला आहे. तर, सोमवारपासून (दि. १९) सरकारी कर्मचाऱ्यांसाठी हेल्मेटसक्ती लागू केली आहे. या पाश्र्वभूमीवर आज हेल्मेटसक्तीविरोधी कृती समितीने बैठकीचे आयोजन केले होते. माजी महापौर शांतीलाल सुरतवाला, मोहनसिंग राजपाल, अंकुश काकडे, श्याम देशपांडे, विवेक वेलणकर, संदीप खर्डेकर, रूपाली पाटील, संजय बालगुडे, धनंजय जाधव, बाळासाहेब रुणवाल, प्रदीप देशमुख, दिनेश भिलारे आदी यावेळी उपस्थित होते.
सर्वोच्च न्यायालयाने हेल्मेटसक्तीचा निर्णय राज्यांवर सोपविला आहे. पालिका क्षेत्रात हेल्मेटसक्ती नसावी, असा निर्णय सरकारने घेतलेला आहे. असे असताना पुण्यात हेल्मेटसक्ती कोणत्या कायद्याच्या आधारे होत आहे? असा प्रश्न बैठकीत उपस्थित करण्यात आला. विनाकारण शहराचे वातावरण ढवळून नागरिकांमध्ये असंतोष पसरविण्याचा प्रयत्न करू नका, असे विवेक वेलणकर यांनी सांगितले. सुरतवाला म्हणाले, आम्ही ज्येष्ठ नागरिक आहोत. दुचाकी हे आमच्या प्रवासाचे साधन आहे. हेल्मेटसक्ती करण्यापेक्षा कायदा-सुव्यवस्थेकडे लक्ष देण्यात यावे.
संपूर्ण शहर खोदलेले आहे, हेल्मेट घालून गाडी चालविणार कुठे?
मेट्रो व रस्त्यांच्या कामांसाठी संपूर्ण शहर खोदलेले आहे. त्यामुळे २०-३०च्या वेगानेही गाडी पळविता येत नाही. हेल्मेट घालून गाडी कुठे चालविणार? अशा प्रश्न शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख श्याम देशपांडे यांनी उपस्थित केला. तसेट अधिकाऱ्यांनी पुण्याला ‘प्रयोगशाळा’ करून ठेवले आहे. नवीन अधिकारी आला की आपले वेगळेपण दाखविण्यासाठी केला नवीन प्रयोग, अशी टीकाही त्यांनी केली.
तीव्र आंदोलन उभारणार
दोन वर्षांपूर्वी ग्राहक पेठेचे सूर्यकांत पाठक यांनी हेल्मेटसक्तीविरोधी कृती समितीचे नेतृत्व केले होते. या वेळेसही त्यांच्या नेतृत्वात या हेल्मेटसक्तीविरोधात तीव्र आंदोलन उभारण्यात येणार आहे. सर्वप्रथम पोलीस आयुक्तांना निवेदन देऊ. त्यानंतर चौकाचौकात निदर्शने, जाहीर सभा, रास्ता रोको, एवढे करूनही जर ऐकले नाहीत, तर सविनय काययदेभंग करू, असे आंदोलनाचे स्वरूप असल्याचे अंकुश काकडे यांनी सांगितले.






























































