
गेल्या 3 वर्षांपासून रशियाविरुद्ध निकराची झुंज देणारे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर झेलेन्स्की नव्या संकटात सापडले आहेत. देशाची राजधानी कीवसह अनेक शहरांत झेलेन्स्की यांच्या विरोधात लोक रस्त्यावर उतरले आहेत. झेलेन्स्की सरकारने मंजूर केलेला भ्रष्टाचारविरोधी कायदा यास कारणीभूत ठरला आहे.
झेलेन्स्की सरकारने नव्याने मंजूर केलेला भ्रष्टाचारविरोधी कायदा नॅशनल अॅण्टी करप्शन ब्युरो आणि स्पेशलाइज्ड अॅण्टी करप्शन प्रॉसिक्यूटरच्या अधिकारांवर गदा आणणारा आहे. या कायद्याआडून सरकारला स्वतःचा भ्रष्टाचार झाकता येणार आहे, असा जनतेचा आरोप आहे. हा कायदा मागे घेतला जावा, अशी आंदोलकांची मागणी आहे.
झेलेन्स्की यांनी बोलावली आपत्कालीन बैठक
युक्रेन सरकारच्या या कायद्याला आधीच विरोध होता, मात्र त्याकडे दुर्लक्ष करून झेलेन्स्की यांनी कायद्याच्या मसुद्यावर स्वाक्षरी केली. त्यामुळे विरोध अधिकच तीव्र झाला आहे. या पार्श्वभूमीवर झेलेन्स्की यांनी विरोधक आणि सुरक्षा अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यात पुढील रणनीतीवर चर्चा करण्यात आली.