जुन्या बसमध्ये साकारले कायमस्वरूपी ग्रंथालय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भुवनेश्वरमध्ये बकुळ फाऊंडेशनचा अनोखा प्रयोग

लहानथोरांना वाचनाची गोडी लागावी, त्यांना पुस्तके सहज उपलब्ध व्हावी, यासाठी भुवनेश्वर येथील बकुळ फाऊंडेशनने जुन्या, वापरात नसलेल्या बसचे रूपांतर एका ग्रंथालयात केले आहे. ही फिरती लायब्ररी नसून कायमस्वरूपी ग्रंथालय आहे. ओडिशा राज्य परिवहन मंडळाची ही बस असून त्यामध्ये सुमारे चार हजार पुस्तके आहेत.

मागील 15 वर्षांपासून बकुळ फाऊंडेशन ओडिशामध्ये ग्रंथ चळवळ राबवत आहे. लोकांना वाचनाची गोडी लागावी, किंवा जिथे लायब्ररी किंवा पुस्तकांची दुकाने नाहीत, तिथे पुस्तके उपलब्ध करून द्यावी, या उद्देशाने बकुळ फाऊंडेशन काम करत आहे. याआधी सार्वजनिक वाचनालय, पुस्तक शॉपिंग सेंटर, पुस्तक पॅफे असे उपक्रम त्यांनी राबवले आहेत. तसेच ट्री लायब्ररी आणि फ्रीजमध्ये लायब्ररी यासारख्या नावीन्यपूर्ण संकल्पना अमलात आणल्या आहेत. त्यानंतर फाऊंडेशनने आता बसमध्ये ग्रंथालय सुरू केले आहे.

भुवनेश्वरमधील कलाभूमी येथील क्राफ्ट म्युझियमच्या बाहेर बसमध्ये ग्रंथालय सुरू झाले आहे. त्यामध्ये ओडिया आणि इंग्रजी भाषेतील पुस्तके असल्याची माहिती संस्थापक सुजित महापात्रा यांनी दिली.

ग्रंथालय साकारताना बसमधील आसने हटवण्यात आली आणि एका बाजूला पुस्तकांसाठी कपाटे तयार करण्यात आली. दुसऱया बाजूला वाचकांसाठी लांबलचक बाकडा बनवला. बसमधील मागच्या काही सीट्स तशाच ठेवण्यात आल्या आहेत. ड्रायव्हरची खुर्ची, स्टिअरिंग व्हिल वाचकांसाठी सेल्फी पॉइंट ठरू शकते. बसच्या बाहेरील बाजूला ओडिशातील चित्रशिल्प संस्कृती दर्शवणारे डिझाईन आहेत.