अल्पवयीन मुलीला पाहून गाणं गाणाऱ्या विकृताला तीन वर्षांची शिक्षा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
molestation-1

शेजारी राहणाऱ्या अल्पवयीन मुलीकडे पाहून गाणं म्हणणाऱ्या एका आरोपीला पोक्सो न्यायालयाने तीन वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. तक्रार करताना जात असताना आरोपीने तिला मारहाण देखील केली होती.

आरोपीचं वय 43 वर्षं इतकं असून तो विवाहित आहे. ही घटना 12 मार्च 2017 रोजी घडली. जेव्हा पीडिता आपल्या मावशीच्या घरी आईचा फोन देण्यासाठी जात होती. आरोपी हा पीडितेचा शेजारी आहे. या घटनेपूर्वी अनेक दिवस तो पीडितेचा पाठलाग करत होता आणि तिला पाहून गाणं गायचा. त्या दिवशी देखील तो गात गात तिच्या पाठी जाऊ लागला. जेव्हा ती आपल्या मावशीकडे पोहोचली तेव्हा तिने आरोपीला याचा जाब विचारला. तेव्हा आरोपीने तिच्याशी भांडायला सुरुवात केली.

ते भांडण ऐकून पीडितेची आई आणि मावशी बाहेर आले. पीडितेच्या आईने आरोपीला पोलीस स्टेशनमध्ये जायचा इशारा दिला. त्यामुळे बिथरलेल्या आरोपीने अल्पवयीन मुलगी आणि तिच्या आईला थांबवायचा प्रयत्न केला. या दरम्यान त्याने पीडितेला मारहाण केली. तिला सोडवायला मध्ये पडलेल्या तिच्या आई आणि मावशीलाही त्याने मारहाण केली.

या प्रकरणी पोक्सो न्यायालयात सुनावणी पार पडली. त्यात आरोपीला पीडितेचा छळ केल्या प्रकरणी न्यायालयाने दोषी ठरवलं. शेजारी असल्याने आरोपीला पीडिता अल्पवयीन असल्याची माहिती होती. आरोपीचं वय, कौटुंबिक परिस्थिती पाहता त्याच्याकडून हे वर्तन निश्चित योग्य नव्हतं. तसंच, त्याचं प्रत्येक कृत्य हे लैंगिक हेतूने केलं गेलं होतं, हे सिद्ध होत असल्याचं म्हणत न्यायालयाने विकृताला तीन वर्षांची शिक्षा दिली.