
सामना प्रतिनिधी । परभणी
देशभरात इंधन दरवाढीचे सत्र सुरूच आहे. राज्यातील विविध शहरात वेगवेगळ्या दरामुळे आज नागरिकांना जास्त पैसे मोजावे लागत आहेत. त्यात सर्वात महाग पेट्रोल आणि डिझेल हे परभणीत विकले जात आहेत. परभणी जिल्ह्यात पेट्रोल हे ८९.२४ रुपये तर डिझेल ७७.१३ पैश्यांनी नागरिकांना खरेदी करावे लागत आहेत. त्यामुळे परभणीकरांनी यावर संताप व्यक्त केला आहे.
सर्वात महाग पेट्रोल व डिझेल परभणीमध्ये आहे. तेथे पेट्रोल ८९.२४ व डिझेल ७७.१३ रुपये प्रति लीटर आहे. परभणीजवळ इंधनाचा कुठलाच डेपो नाही. त्यामुळे शहराला ३३० किमी दूर मनमाड डेपोतून इंधनाची आवक होते. त्याचा वाहतूक खर्च वाढत असल्याने इंधन महाग आहे. पेट्रोल-डिझेल दरात शुक्रवारी ४६ पैसे व ५३ पैसे वाढ झाली. गेल्या १३ दिवसांत पेट्रोल २.२८ व डिझेल २.९९ रुपये प्रति लीटरने महाग झाले. डिझेल दरवाढीने मालवाहतूक महागली आहे. त्यामुळे दैनंदिन गरजेचा भाजीपाला, धान्य यांची दरवाढ सुरू झाली आहे. भाज्या किलोमागे २० रुपयांनी महागल्या आहेत. धान्याचे दरही किलोला १० रुपयांनी वाढले आहेत. स्कूल व्हॅनचालकांनी १०० रुपये भाडेवाढ जाहीर केली होती, पण डिझेल दरवाढ थांबत नसल्याने त्यांनी आणखी भाडेवाढीचा विचार सुरू केला आहे. बहुतांश ऑटोरिक्षा पेट्रोल व डिझेलवर चालतात. त्यामुळे त्यांनीही आता दरवाढ सुरू केली आहे.
परभणी शहरातील हिंदुस्थान पेट्रोलियमच्या पंपांवरून आज पेट्रोल ८९.२४ पैसे, डिझेल ७७.१३ तर भारत पेट्रोलियमच्या पंपांवर हेच पेट्रोल ८९.२७ आणि डिझेल ७७.१५ रुपये, इंडियन ऑइल पेट्रोल ८९.१६, डिझेल ७७.०४ प्रति लिटरने परभणी करांना खरेदी करावे लागत आहेत. जे राज्यभरातील सर्वच शहरांच्या मानाने सर्वात जास्त आहे. गेल्या काही महिन्यापासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये सातत्याने वाढ केली जात आहे. नुकतीच भरीस भर म्हणून पेट्रोलच्या दरात ३१ तर डिझेलच्या दरात ३९ पैशांनी पून्हा एकदा वाढ करण्यात आली आहे. पेट्रोलचे दर लवकरच शंभरी गाठते की काय? अशी भीती निर्माण झाली आहे. इंधन दरवाढीमुळे वाहतुक, दळणवळण, व्यापारी आणि प्रवास यावर वितरीत परिणाम झाला आहे. ही इंधन दरवाढ रोजच होत असल्याने याचा परिणाम इतर वाहतुकीवर होत असून त्यामुळे वाहतुकीचे दर ही वाढवले जात आहेत जे सर्वसामान्य नागरिकांना परवडणारे नसल्यानं ही वाढणारी इंधन दरवाढ कमी करण्याची मागणी करत परभणीकरांनी यावर संताप व्यक्त केला. दरम्यान, आजही इंधन महाग झालं आहे. पेट्रोलचे दर ४८ पैशांनी तर डिझेल ५६ पैशांनी वाढले आहेत. महाराष्ट्राची राजधानी मुंबईत एक लिटर पेट्रोलसाठी आज ८७ रुपये ४५ पैसे मोजावे लागत आहेत. तर डिझेल ७६ रुपये ५७ पैसे लीटर आहे.































































