
राज्यातील पेट्रोल पंपांवर रांगा लागलेल्या असताना केंद्रातील मोदी सरकारने सर्वसामान्यांच्या खिशाला भगदाड पाडले असून पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये आणखी वाढ केली आहे. आजपासून पेट्रोलचे दर प्रतिलिटर 87 पैशांनी आणि डिझेलचे दर 91 पैशांनी वाढवण्यात आले आहेत. गेल्या आठ दिवसात पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये तिसऱ्यांदा दरवाढ झाली आहे. त्यामुळे महागाईने त्रस्त असलेल्या जनतेच्या खिशाला आणखी कात्री लागणार आहे. ‘एएनआय’ने याबाबत वृत्त दिले आहे.
पाच राज्यातील विधानसभा निवडणुका संपताच मोदी सरकारने पेट्रोल-डिझेलची दरवाढ केली होती. 16 मे रोजी पेट्रोल-डिझेलचे दर प्रतिलिटर 3 रुपयांनी वाढवण्यात आले होते. त्यानंतर पाचच दिवसांनी पेट्रोल-डिझेलच्या दरामध्ये प्रतिलिटर 90 पैशांची वाढ करण्यात आली होती. आता यात आणखी वाढ करण्यात आल्याने महागाईने मेटाकुटीला आलेल्या जनतेला आणखी भुर्दंड सोसावा लागणार आहे.
दरवाढीनंतर प्रमुख शहरातील पेट्रोलच्या किंमती
मुंबई – 108.49 रुपये
दिल्ली – 99.51 रुपये
कोलकाता – 110.64 रुपये
चेन्नई – 105.31 रुपये
दरवाढीनंतर प्रमुख शहरातील डिझेलच्या किंमती
मुंबई – 95.02 रुपये
दिल्ली – 92.49 रुपये
कोलकाता – 97.02 रुपये
चेन्नई – 96.98 रुपये
As per sources, Diesel prices increased by 91 paise per litre and petrol by 87 paise per litre. Diesel in Delhi hiked to Rs 92.49 per litre, and Petrol hiked to Rs 99.51.
RSP (Retail Selling Price) of four Metro cities for 19.05.26 are as follows:
MS (petrol) prices
Delhi…
— ANI (@ANI) May 23, 2026
दरम्यान, या दरवाढीनंतरदेखील तेल कंपन्यांना दररोज कोट्यवधी रुपयांचा तोटा सहन करावा लागत असून, तो भरून काढण्यासाठी आणखी 13 ते 17 रुपयांची दरवाढ करावी लागू शकते. त्यामुळे नागरिकांना टप्प्याटप्प्याने इंधन दरवाढीचे झटके मिळू शकतात, असा अंदाज कोटक इन्स्टिटय़ुशनल इक्विटीज या ब्रोकरेज संस्थेने व्यक्त केला आहे.
इराण युद्ध सध्या थांबलेले असले तरी त्याची धग कायम आहे, ते कोणत्याही क्षणी भडकू शकते. या युद्धामुळे जगाला होणारा कच्च्या तेलाचा पुरवठा विस्कळीत झाला आहे. यामुळे कच्च्या तेलाच्या किमती 100 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचल्या आहेत. त्यामुळे हिंदुस्थानात गेल्या दोन महिन्यांत महागाई वाढली आहे. मात्र इराण युद्ध न थांबल्यास देशात महागाईचा भडका उडू शकतो, असा इशारा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दिला आहे.
एकीकडे इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य जनतेचे बजेट कोलमडले आहे, तर अनेक राज्यांमध्ये इंधन विक्रीला मर्यादा घालण्यात आल्या आहेत. त्यामुळे पेट्रोल पंपांवर रांगा लागत असल्याचे चित्र आहे.



























































