औषध कंपन्यांनी भाजपला ९४५ कोटी रुपयांची दिली देणगी, सिरपमुळे होणाऱ्या मृत्यूंबद्दल दिग्विजय सिंह यांचा दावा

लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्या औषध कंपन्यांवर सरकार कोणतीही कठोर कारवाई करत नाही, कारण या कंपन्या भाजपला निवडणूक देणग्या देतात, असा गंभीर आरोप काँग्रेस नेते दिग्विजय सिंग यांनी भाजपवर केला आहे. मध्य प्रदेश व राजस्थानात कोल्ड्रिफ सिरपमुळे अनेक मुलांचा मृत्यू झाला आहे. याचबद्दल भाष्य करताना त्यांनी हा आरोप केला आहे.

भोपाळमध्ये एका आयोजित पत्रकार परिषद बोलताना दिग्विजय सिंग म्हणाले की, “२ सप्टेंबरपासून परसियामध्ये त्याच कफ सिरपचे सेवन केल्याने २६ मुलांचा मृत्यू झाला आहे, ज्यामध्ये ४८.६ टक्के डायथिलीन ग्लायकोल (DEG) असल्याचे आढळून आले होते. तर त्याची सुरक्षित मर्यादा फक्त ०.०१ टक्के असायला हवी होती.”

दिग्विजय सिंग यांनी असा दावा केला आहे की, विषारी औषधे विकणाऱ्या औषध कंपन्यांना संरक्षण मिळत आहे. कारण त्यांनी केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपला निवडणूक निधी पुरवला होता.” ते म्हणाले की, औषध कंपन्यांनी निवडणूक रोख्यांद्वारे भाजपला एकूण ९४५ कोटी देणगी दिली.”

दिग्विजय सिंह म्हणाले, “ज्या ३५ कंपन्यांनी देणगी दिली होती, त्यांनी उत्पादित केलेली औषधे गुणवत्ता मानकांनुसार नव्हती. ते म्हणाले की, हे लोकांच्या जीवनाशी आणि सुरक्षिततेशी तडजोड केल्याचे स्पष्ट उदाहरण आहे आणि सत्तेत असलेल्यांच्या संरक्षणामुळे कोणतीही जबाबदारी घेतली जात नाही.