‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेत चोरट्यांनी टाकला ‘डाव’, दोघांच्या गळ्यातील चेन हिसकावल्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सातारा येथील छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलात ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धेवेळी आखाड्याजवळ दोघांच्या गळ्यातील सोन्याच्या चेन हिसकाविल्या गेल्या. याप्रकरणी पोलिसांत जबरी चोरीचा गुन्हा दाखल असून, सुमारे तीन लाखांचा ऐवज चोरीस गेला आहे.

शनिवारी सायंकाळी सव्वासातच्या सुमारास ‘महाराष्ट्र केसरी’ किताबासाठी लढत होती. यावेळी चोरट्यांनी दोघांच्या गळ्यातील सोनसाखळ्या हिसकाविल्या. याप्रकरणी शंभूराज शिवाजी भोसले (वय 25, रा. भोसलेमळा, राधिका रोड, सातारा) यांनी तक्रार दिली आहे.

या जबरी चोरीत कुस्ती आखाड्याजवळ तक्रारदाराच्या गळ्यातील जाड पिळाची अडीच तोळ्यांची चेन हिसकावून नेली. तसेच स्वप्नील शंकर घोडके (वय 28, रा. विजयनगर, ता. कराड) यांच्या गळ्यातूनही चार तोळे वजनाची चेन नेण्यात आली. या दोन्ही घटनांत साडेसहा तोळे वजनाच्या सोन्याच्या दोन चेन चोरीस गेल्या आहेत. याची किंमत सुमारे तीन लाख रुपये आहे. याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा नोंद झाला आहे.