
सामना प्रतिनिधी । हडोळती
अहमदपूर तालुक्यातील शेतकरी दुष्काळाचा सामना करीत आहेत. सध्या मुबलक रब्बी पीके आली असतानाच रानडुकरे त्याचे अतोनात नुकसान करीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांपुढे दुष्काळात तेरावा महिना अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
गेल्या तीन – चार वर्षांपासून हे वन्यप्राणी मानवी वस्तीजवळ येवू लागले आहेत. त्यामुळे नित्य रहदारी असलेल्या रस्त्याच्या कडेच्या शेतातही हे प्राणी दिवसाही वास्तव्य करू लागले आहेत. सध्या शेतात एकट्याने जाणे धोकादायक ठरत आहे. मुळातच परिसरातील शेतकरी दुष्काळाच्या सावटाखाली वावरत असताना आणखी चिंताग्रस्त झाला आहे. येथील परिसरात रानडूकरांनी धुमाकूळ घातला आहे. सध्या निसवलेली व पोटऱ्यात आलेली ज्वारी डोळ्यादेखत आडवी झालेली दिसत आहे. या रानडुकराचा बंदोबस्त करणे शेतकऱ्यांसाठी अशक्य काम आहे. त्यामुळे वनखात्याने लक्ष घालण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.
































































