लालबागकरांना मिळणार पाच दिवसांनी पाणी; जलवाहिनी दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
pipe-line-repair

सामना प्रतिनिधी । मुंबई

लालबागमध्ये गेल्या बुधवारी 16 जानेवारीला फुटलेली जलवाहिनी दुरुस्त करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून उद्या मंगळवारपासून पाणीपुरवठा सुरळीत होण्याची शक्यता आहे. मायक्रोटनेलिंगचे काम सुरू असताना मशीनचा धक्का लागल्यामुळे 48 इंचाची जलवाहिनी फुटली होती. ही अवाढव्य मशीन बाहेर काढण्यात पालिकेच्या कामगारांना यश आले आहे.

लालबागमध्ये पाच दिवसांपूर्वी मायक्रोटनेलिंगचे काम सुरू असताना कंत्राटदाराने 48 इंचाची मुख्य जलवाहिनी फोडल्यामुळे गेल्या पाच दिवसांपासून लालबागपासून थेट दक्षिण मुंबईपर्यंत अनेक भागांत पाणीबाणी निर्माण झाली आहे. मायक्रोटनेलिंगचे मशीन आत असताना दुरुस्तीचे काम करणे पालिकेच्या कामगारांसाठी मुष्कील बनले होते. हे मशीन बाहेर येत नाही तोपर्यंत दुरुस्ती करणे अशक्य झाले होते. रविवारी रात्री हे मशीन बाहेर काढण्यात आले. शिवसेनेचे स्थानिक नगरसेवक अनिल कोकीळ यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे सोमवारी दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले. मंगळवारपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत होण्याची शक्यता पालिकेच्या अभियंत्यांनी व्यक्त केली आहे.

सोमवारी सकाळी दुरुस्तीचे काम सुरू असताना मोठय़ा प्रमाणावर पाणीगळती सुरू होती. त्यामुळे हा संपूर्ण भाग जलमय झाला होता. दुरुस्तीच्या कारणास्तव या रस्त्यावरून एकेरी वाहतूक सुरू होती. हिंदमाता परिसरातील पावसाच्या पाण्याचा निचरा वेगाने व्हावा म्हणून या परिसरात ब्रिटानिया पंपिंग स्टेशनपर्यंत 1800 इंचाची पर्जन्य जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. त्याकरिता जमिनीखाली खोल मशीनने बोगदा खणला जात आहे. हे काम सुरू असतानाच 15 जानेवारीला लालबाग परिसरात 48 इंचाच्या मुख्य जलवाहिनीला धक्का लागला व ती फुटल्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले. चार दिवस उलटून गेले तरी या जलवाहिनीची दुरुस्ती न होऊ शकल्यामुळे परिसरातील लोकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.