विवेक तिवारी मृत्युप्रकरण; आरोपी पोलिसाकडे प्रशिक्षण नसतानाही सापडलं पिस्तुल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । लखनौ

उत्तर प्रदेशात सध्या गाजत असलेल्या अॅपल मॅनेजर विवेक तिवारी यांच्या मृत्युप्रकरणात एक धक्कादायक खुलासा झाला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी प्रशांत चौधरी याच्याकडील पिस्तुलानेच विवेक यांच्यावर गोळी झाडली गेल्याचं समोर आलं आहे. विशेष म्हणजे, प्रशांतला पिस्तुल चालवण्याचं कोणतंही प्रशिक्षण नसतानाही त्याच्याकडे पिस्तुल सापडलं आहे.

२९ सप्टेंबर रोजी अॅपलचे विभागीय व्यवस्थापक विवेक तिवारी आपल्या महिला सहकाऱ्यासोबत घरी जात होते. वाटेत तपासणीसाठी गाडी थांबवण्याच्या इशाऱ्याला न जुमानता त्यांनी गाडी सुरूच ठेवल्यामुळे पोलिसांनी त्यांच्यावर गोळीबार केला होता. या गोळीबारात विवेक यांचा मृत्यू झाला होता. तेव्हापासून हे प्रकरण चांगलंच तापलं आहे. नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, विशेष तपास पथकाने केलेल्या चौकशीत पिस्तुल सापडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लखनौमध्ये फक्त प्रशांतच नाही, तर ४३ पोलीस ठाण्यांमधील तीनशेहून अधिक पोलीस शिपायांना ट्रेनिंगशिवायच पिस्तुलं मिळाल्याचं उघड झालं आहे. नियमांनुसार, शिपायांना पिस्तुल अथवा रिव्हॉल्वर देता येत नाही. पण, कामाच्या ठिकाणी छाप पडावी आणि मोठ्या वजनदार रायफल्स उचलाव्या लागू नयेत म्हणून पोलीस शिपाई अशी पिस्तुलं बाळगत असल्याचा खुलासाही झाला आहे.

पोलीस प्रशिक्षण नियमावलीनुसार, शिपाई ते राजपत्रित अधिकाऱ्यांपर्यंत पदानुसार शस्त्रांचा प्रकार ठरत असतो. पोलीस शिपायांना ३०३ बोर रायफल चालवण्याचं प्रशिक्षण दिलं जातं. तर त्यावरील हुद्द्यांसाठी एके-४७, एनपी-५, ३८ बोर रिव्हॉल्वर, ९ एमएमचं पिस्तुल अशी विभागणी असते. ही हत्यारं चालवण्यासाठी त्यांना सहा महिन्यांचं प्रशिक्षण घ्यावं लागतं. पण, लखनौमध्ये फक्त ड्युटीवर असताना छाप पाडण्यासाठी अनेक पोलीस सर्रास पिस्तुल आणि रिव्हॉल्व्हर बाळगत असल्याचं उघड झालं आहे. शिपायांना देण्यात येणारी रायफल ही वजनदार असते. त्यामुळे तिला उचलण्यापेक्षा हलक्या वजनाचं पिस्तुल बेकायदेशीररित्या पोलीस वापरताना दिसत आहेत. याबाबत वरिष्ठांना माहीत असूनही ते याबाबत काहीही कारवाई करत नसल्याचंही समोर आलं आहे.

summary-pistol found police constable at vivek tiwari case