जोरदार चढाईसाठी यू मुंबाचे बहाद्दर सज्ज; यू मुंबाच्या जर्सीचे अनावरण, दहाव्या मोसमाला 2 डिसेंबरपासून प्रारंभ

पहिले तीन मोसम गाजवल्यानंतर मागे पडलेली यू मुंबा प्रो-कबड्डी लीगच्या दहाव्या सत्रात धमाका करण्यासाठी सज्ज झालीय. मुंबईच्या एकतेचे, चिकाटीचे आणि शक्तीचे प्रतीक असलेल्या यू मुंबाच्या जर्सीचे अनावरण करण्यात आले.

प्रो-कबड्डी लीगने कबड्डीत क्रांती घडवल्यानंतर यू मुंबाने पहिल्या तीन मोसमात उल्लेखनीय कामगिरी केली होती. पहिल्या तिन्ही मोसमाच्या अंतिम फेरीत मुंबा खेळली, पण जेतेपद दुसऱ्या मोसमातच जिंकता आले. त्यानंतर सलग सहा मोसमात मुंबा एकदाही अंतिम फेरीपर्यंत पोहोचू शकली नाही. मात्र गेल्या सहा वर्षांची कसर भरून काढण्याची लक्ष्यच मुंबाने ठेवले आहे. मुंबाचे कर्णधार सुरिंदर सिंह, महेंद्रसिंह, गिरीश इरनाक आणि प्रणय राणे यांच्या उपस्थितीत जर्सीचे अनावरण करण्यात आले. या अनावरणानंतर मुंबईचा लोकप्रिय कबड्डीपटू गिरीश इरनाकला ‘स्पिरिट ऑफ मुंबा कर्णधार’ घोषित करण्यात आले. तसेच  रिंकू शर्मा आणि महेंद्र सिंग या दोघांची उपकर्णधार म्हणून निवड जाहीर करण्यात आली. याप्रसंगी यू मुंबाचे मालक रॉनी स्क्रूवाला, सीईओ सुहैल चंधोक आणि ‘सॅम बहाद्दर’ विकी कौशलही आवर्जून उपस्थित होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Marathi Fire (@marathifire)

प्रो-कबड्डीच्या गेल्या नऊ मोसमात सर्वाधिक जेतेपदे आणि जेतेपदांची हॅटट्रिक पटना पायरेट्सने केली आहे. त्यांनी 2016 साली दोन आणि 2017 साली एक अशी सलग तीनदा बाजी मारली. जयपूर पिंक पँथर्सचा संघ पहिले आणि नवव्या मोसमात विजेते ठरलेत तर मुंबासह बंगळुरू बुल्स, बंगाल वॉरिअर्स आणि दबंग दिल्ली या संघांनीही एकेक जेतेपदे पटकावली आहेत. अद्याप पुणेरी पलटन, तेलुगु टायटन्स, तमिळ थलैवाज, यूपी योद्धाज, गुजरात जायंट्स आणि हरयाणा स्टीलर्स या सहा संघांना एकही जेतेपद जिंकता आलेले नाही. 12 संघांचा सहभाग असलेल्या प्रो-कबड्डीच्या दहाव्या मोसमाची सुरुवात येत्या शनिवार, 2 डिसेंबरपासून होणार असून ती 21 फेब्रुवारीपर्यंत चालेल. ही लीग 12 शहरांमध्ये टप्प्याटप्प्याने खेळविली जाणार आहे.