अजित पवारांच्या भाषणादरम्यान आरक्षणाच्या मागणीचे फलक झळकावले; उडाला एकच गोंधळ, एक ताब्यात

‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमाचं आयोजन भंडाऱ्यात करण्यात आलं होतं. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आरक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य करताना गोंधळ झाल्याची माहिती समोर येत आहे. आरक्षणाची मागणी पूर्ण करा नाही तर खुर्च्या खाली करा अशी घोषणा देत हातातले बॅनर एका व्यक्तीकडून फडकावण्यात आले. यामुळे भाषणादरम्यान चांगला गोंधळ उडाला.

अखेर पोलिसांनी या व्यक्तीला ताब्यात घेऊन कार्यक्रम स्थळावरून बाहेर नेलं. आरक्षणाच्या मुद्द्यावरून सध्या राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. मराठा, धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न आणि ओबीसींचा प्रश्न यावरून राज्यात परिस्थिती अत्यंत गंभीर बनली असून सरकारची तारेवरची कसरत सुरू आहे. अशा पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी आपल्या भाषणावेळी आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलण्यास सुरुवात केली. त्याचवेळी संबंधित व्यक्तीनं सरकारकडे आरक्षण मिळालेच पाहिजे अशी मागणी करण्याचा आशय असलेले फलक झळकवले आणि सोबत घोषणाही दिल्या.

सर्वोच्च न्यायालयात टिकलं पाहिजे असं आरक्षण मिळावं आणि इतर समाजालाही त्यामुळे कोणत्याही प्रकारचं नुकसान होता कामा नये, असे प्रयत्न सरकार करत आहे. मात्र, काही लोक वेगळ्या पद्धतीचं वातावरण निर्माण करण्याचं प्रयत्न करत असल्याचा आरोप अजित पवारांनी आपल्या भाषणात केला. विशेष म्हणजे आजारपणातून बरे झाल्यानंतर अजित पवारांचा हा पहिलाच शासकीय कार्यक्रम आहे. त्यामुळे या कार्यक्रमावेळी अजित पवारांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य केलं. त्याच दरम्यान हा प्रकार घडला.