‘हल्दीराम’च्या मालकाचे अपहरण करण्याचा प्रयत्न, पाच कुख्यात गुन्हेगारांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नागपूर

आंतरराष्ट्रीय ब्रॅण्ड असलेल्या ‘हल्दीराम’च्या मालकाला दोन महिन्यांपासून ५० लाखांची खंडणी मागणे तसेच अपहरण करून जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या पाच कुख्यात गुन्हेगारांना अटक करण्यात अखेर धंतोली पोलिसांना यश आले. टोळीतील एक आरोपी फरार असून या प्रकरणाचा मास्टरमाइंड माजी ड्रायव्हरच असल्याचे उघडकीस आले आहे.

हल्दीरामचे मालक राजेंद्र शिवकिशन अग्रवाल (वय ५५, रा. वर्धमाननगर) दर शनिवारी लोहापुलाजवळील शनिमंदिरात दर्शनासाठी जातात. २७ एप्रिलला सकाळी अकरा वाजता दर्शनासाठी शनिमंदिरात गेले असता तेथे दबा धरून बसलेले आरोपी सौरव भीमराव चव्हाण (वय २१, रा. रामबाग), अतुल गोपाल पाटील (२४, रामबाग), रोहित राजेंद्र घुमडे (वय २९, सोमवारी क्‍वॉर्टर्स, सक्‍करदरा), विनोद उमेश्‍वर गेडाम (वय २३, पाचनल, रामबाग) आणि श्‍याम बहाद्दूर सिंग (वय ५५, रा. हिवरीनगर) यांनी त्यांचा अपहरण करण्याचा कट रचला होता. मंदिरासमोर मिठाई वाटत असताना चार आरोपींनी राजेंद्र अग्रवाल यांना व्हॅनमध्ये कोंबण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरडाओरड झाल्यामुळे आरोपी व्हॅन घेऊन पळून गेले. या प्रकरणी धंतोली पोलिसांनी गांभीर्याने दखल घेऊन तपास केला. मात्र, आरोपींचा पत्ता लागला नव्हता. यानंतर दोन महिने आरोपी शांत बसून होते. २८ जूनला पुन्हा मोबाईल आणि घरच्या फोनवर फोन केला. त्यांनी ५० लाखांची खंडणीची मागणी केली. पैसे न दिल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. घाबरलेल्या अग्रवाल यांनी धंतोलीचे ठाणेदार दिनेश शेंडे यांच्याकडे तक्रार दाखल दिली.

आरोपींनी धमकी देण्यासाठी एका मजुराचा मोबाईल चोरला. त्या दाम्पत्याचे रस्त्यावर गोळ्या-बिस्किटांचे दुकान आहे. त्या मोबाईलवरून ५० लाखांची खंडणी मागितली, तसेच वारंवार धमक्‍या दिल्या. पोलिसांनी लोकेशन आणि मोबाईल डाटा काढल्यानंतर मोबाईल मालकापर्यंत पोहोचले. त्यांनी मोबाईल चोरीला गेल्याचे सांगितले.

आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी जुन्या नोकरांची यादी काढली. सोडून गेलेल्या नोकरांची चौकशी केली. त्यानंतर शनिमंदिराजवळ असलेल्या टॉवर लोकेशनमध्ये असलेले मोबाईल आणि अन्य मोबाईलशी तुलना करण्यात आली. त्यावरून मास्टरमाइंड श्‍याम सिंग याचे नाव समोर आले.