क्रिप्टोकरन्सीचे बाजारात नियमन करा!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

क्रिप्टोकरन्सीचा वापर व बाजारात त्याचे नियमन करण्यासाठी त्यासंदर्भात कायदे तयार करण्यात यावेत, अशी मागणी करत मुंबईतील एका वकिलाने उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर लवकरच हायकोर्टात सुनावणी होण्याची शक्यता आहे.

देशातील क्रिप्टोकरन्सीचा बेकायदेशीर वापर सुरू असून हा व्यवसाय अनियंत्रित आहे. एखाद्या गुंतवणूकदाराची फसवणूक झाल्यास त्यांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी कायद्यात कोणतीही तरतूद अथवा यंत्रणा नाही. त्यामुळे क्रिप्टोकरन्सीचे नियमन करण्यात यावे, अशी मागणी ऍड. आदित्य कदम यांनी याचिकेद्वारे केली आहे. क्रिप्टोकरन्सीचा वापर अधिकृत केला नाही तर मनी लॉण्डरिंग प्रकरणांमध्ये वाढ होण्याचा धोका आहे. ड्रग्जचा बेकायदेशीर चालणारा व्यापार फोफावण्याची शक्यता आहे. याशिवाय क्रिप्टो चलनाद्वारे दहशतवाद्यांना होणाऱया वित्तपुरवठय़ावर बंधने घालता येणार नाहीत. त्यामुळे क्रिप्टोकरन्सीचा वापर व बाजारात त्याचे नियमन करण्यासाठी त्यासंदर्भात कायदे तयार करणे गरजेचे असल्याचे ऍड. कदम यांनी याचिकेत म्हटले आहे.