पंतप्रधान खोटारड्यांचे सरदार, देशाची दिशाभूल करत आहेत; काँग्रेस अध्यक्ष खरगे यांची टीका

संघ आणि भाजपचे लोक विषासारखे आहेत अशी टीका काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी केली. तसेच पंतप्रधान खोटारड्यांचे सरदार, देशाची दिशाभूल करत आहेत असेही खरगे म्हणाले.

मल्लिकार्जून खरगे म्हणाले की, संविधानात 50 टक्क्यांपर्यंत आरक्षणाची मर्यादा आहे. पण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या समाजासाठी 10 टक्के आरक्षण वाढवले, त्यामुळे आता आरक्षणाची एकूण मर्यादा 60 टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. तसेच पंतप्रधान मोदी खोटारड्यांचे सरादर आहेत. जर आमच्या पक्षाला थोड्या जागा अधिक मिळाल्या असत्या, तर आम्ही सत्तेवर आलो असतो आणि भाजपचं सरकार पाडलं असतं. संघ आणि भाजपचे लोक विषासारखे आहेत. त्यांचं समर्थन करू नका, एकदा का तुम्ही त्यांची साथ दिली तर तुमचं अस्तित्व संपेल.

खरगे म्हणाले की, नरेंद्र मोदी खोटं बोलून देशाला फसवत आहेत. असे पंतप्रधान देशासाठी उपयोगी ठरत नाहीत. राहुल गांधी हे सवर्ण असूनही, ते दलित आणि मागासवर्गीयांसाठी बोलतात, त्यामुळे सर्वांनी त्यांना पाठिंबा द्यायला हवा. बहुतांश गावांमध्ये फक्त 2-3 टक्केच वरच्या जातीचे लोक असतात, पण तरीही देशावर त्यांचेच राज्य आहे असेही खरगे म्हणाले.

बिहारमध्ये सुरू असलेल्या SIR मोहिमेवरून संसदेत विरोधकांनी मोठा विरोध केला. 25 जुलै रोजी, संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी, मल्लिकार्जुन खरगे यांनी ‘SIR’ लिहिलेला पोस्टर फाडून कचऱ्यात टाकला आणि त्याचा व्हिडीओही सोशल मीडियावर शेअर केला.