
मुंबई आणि महानगर प्रदेशात मेट्रो रेल्वेचे व्यापक जाळे पसरण्यात येत आहे. 2024 पर्यंत मेट्रोतून एक कोटी प्रवासी करतील. मुंबई आणि उपनगरवासीयांच्या सुखकर प्रवासासाठी 20 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च करून पायाभूत सुविधाचे प्रकल्प उभारण्यात येत आहेत तर पुढील पाच वर्षांत देशातील पायाभूत सुविधांवर 100 लाख कोटी रुपये खर्च करण्यात येतील, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केली.
मुंबईत बीकेसीमधील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये एमएमआरडीएच्या वतीने आयोजित कार्यक्रमात मेट्रो रेल्वेच्या 10, 11 व 12 या मार्गाचे व मेट्रो भवनचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच मेट्रोच्या डब्याचे आणि बाणडोंगरी मेट्रो रेल्वे स्थानकाचे उद्घाटन व महामुंबई मेट्रोच्या ब्रॅण्डव्हिजन डॉक्युमेंटचे प्रकाशन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले.
या सोहळ्याला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल, केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अरविंद सावंत, केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री व आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले, खासदार राहुल शेवाळे, राजन विचारे, श्रीरंग बारणे, श्रीकांत शिंदे, मनोज कोटक, गोपाळ शेट्टी, पूनम महाजन, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, शिक्षणमंत्री आशीष शेलार, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे, गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर, रवींद्र चव्हाण, नगरविकास राज्यमंत्री योगेश सागर, अविनाश महातेकर, आमदार मंगलप्रभात लोढा आदी उपस्थित होते.
यावेळी केलेल्या भाषणात नरेंद्र मोदी यांनी चांद्रयान मोहिमेपासून देशाची अर्थव्यवस्था, मुंबईतील मेट्रो प्रकल्प, देशातील पायाभूत सुविधांचे प्रकल्प असा सर्वांचा आढावा घेतला. ते म्हणाले की, मुंबईत गणेशोत्सवाच्या निमित्ताने कोटय़वधी रुपयांच्या खर्चाच्या पायाभूत सुविधांचा श्रीगणेशा होत आहे. 30-35 वर्षांपूर्वी देशात पहिली मेट्रो रेल्वे आली. 2014 पर्यंत काही मोजक्या शहरांमध्ये मेट्रो रेल्वे आली. आज 27 शहरांमध्ये मेट्रो रेल्वे आहे. मुंबई, पुणे, नागपूरमध्ये मेट्रो रेल्वेचे काम वेगाने सुरू आहे. मुंबईच्या पायाभूत सुविधा राज्यातील सरकारने वाढवल्या आहेत. मेट्रो रेल्वेच्या माध्यमातून 50 हजार लोकांना थेट रोजगार उपलब्ध होईल.
गणेशोत्सवाच्या शुभेच्छा
मुंबईतील गणेशोत्सवाचा उत्साह पाहून नरेंद्र मोदी यांनी नमस्कार मुंबईकर, अशी मराठी भाषेत सुरुवात केली. ‘गणपती बाप्पा मोरया’ असा मोदींनी जयघोष केला आणि गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा, अशा शब्दांत मोदींनी मुंबईकरांना सदिच्छा दिल्या. या कार्यक्रमाला येण्यापूर्वी मोदींनी विलेपार्ले येथील लोकमान्य सेवा संघातील गणेशोत्सवाला भेट दिली त्याचाही आवर्जून उल्लेख केला.
महामुंबईत एका तासात कुठेही पोहचता येणार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, मुंबई आणि मुंबई उपनगरांमध्ये मेट्रोच्या जाळ्यांमुळे सार्वजनिक वाहतुकीमध्ये मोठा बदल होईल. मुंबई आणि उपनगरात प्रवास करणे सोपे होईल. प्रवासाचा वेग वाढेल आणि एका तासात या टोकापासून त्या टोकापर्यंत सहज पोहचता येईल, असे वाहतुकीचे जाळे निर्माण होईल. देशातील मेट्रोचे सर्वात मोठे जाळे महाराष्ट्रात होत असून इंटिग्रेटेड ट्रान्सपोर्ट सिस्टीम राबविणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
मेट्रो मार्गांमुळे छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनसपासून थेट ठाणे, मीरा-भाईंदर, डोंबिवली-कल्याण, नवी मुंबईपर्यंत जाता येईल. या तीन मार्गांवरून दहा वर्षांत 40 लाख प्रवासी दररोज प्रवास करतील. 320 किमीच्या या मेट्रो मार्गामुळे एका ठिकाणाहून दुसऱया ठिकाणी जाण्यासाठी काही मिनिटांचा अवधी लागेल. सन 2021-22 पर्यंत 212किमी आणि 2023-24 पर्यंत आणखी 85 किमी मेट्रोचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. मेट्रो ही ग्रीन ट्रान्सपोर्ट सिस्टीम आहे.
उद्धव ठाकरे लहान भाऊ
कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा लहान भाऊ असा उल्लेख करताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला.
चांद्रमोहिमेचे स्वप्न पूर्ण होईल
चांद्रमोहिमेबद्दल बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले की, चंद्रावर पोहोचण्याचे स्वप्न पूर्ण होईल. जोपर्यंत चांद्रमोहीम यशस्वी होणार नाही तोपर्यंत ‘इस्रो’चे शास्त्र्ाज्ञ स्वस्थ बसणार नाहीत. चंद्रावर पोहोचण्याचे स्वप्न पूर्ण होईल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.
प्लॅस्टिकमुक्तीचा संकल्प
प्लॅस्टिकमुक्त मुंबईचा संकल्प करण्याचे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले. गणपतीबाप्पांना निरोप देताना समुद्रात प्लॅस्टिक व कचरा जाणार नाही याची काळजी घेण्याचे त्यांनी आवाहन केले. समुद्र व मिठी नदी प्लॅस्टिकमुक्त करण्याचा संकल्प करा. आपला हा संकल्प देश प्लॅस्टिकमुक्त करण्याची प्रेरणा देईल, असेही ते म्हणाले.






























































