विरोधकांच्या टिकेनंतर पंतप्रधान मोदींनी कश्मीर प्रश्नावर बोलवली मिटिंग; कठोर कारवाईचे दिले आदेश

जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांपासून दहशतवादी हल्ले होत आहेत. या हल्लांवरून विरोधी पक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रातील भाजपप्रणित एनडीए सरकारवर सडकून टीका केली होती. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही थेट पंतप्रधान मोदींना सवाल केला होता. जम्मू-काश्मीरमधील हल्ल्यांना जबाबदार कोण? असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी केला होता. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जम्मू-काश्मीरमधील किंकाळ्या ऐकू येत नाहीत, असा हल्लाबोल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला होता. अखेर केंद्र सरकार जागे झाले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी उच्चस्तरीय बैठक घेत जम्मू-काश्मीरमधील सुरक्षेचा आढावा घेतला.

पंतप्रधान मोदी यांनी घेतलेल्या उच्चस्तरीय बैठकीला राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांच्यासह इतर प्रमुख आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांत रियासी, कठुआ आणि डोडा जिल्ह्यांमध्ये चार ठिकाणी दहशतवादी हल्ले झाले. या हल्ल्यांमध्ये नऊ भाविक ठार झाले तर सीआरपीएफचा एक जवान शहीद झाला. तसेच सात जवानांसह अनेकजण जखमी झाले होते. जम्मू-काश्मीरमधील सुरक्षेसंबंधीच्या स्थितीची माहिती आजच्या बैठकीत देण्यात आली. दहशतवाद विरोधात उचलण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहितीही दिली गेली.

‘दहशतवादाविरोधात कुठलीही कसर ठेवू नका’

दहशतवाद विरोधात आवश्यक असलेल्या सर्व यंत्रणा तैनात करा, अशा सूचना या बैठकीत पंतप्रधान मोदींनी दिल्या. यासोबतच सुरक्षा दलांची तैनाती आणि दहशतवाद विरोधी मोहीमांसंदर्भात गृहमंत्री अमित शहा यांच्याशीही पीएम मोदींनी चर्चा केली. दरम्यान, जम्मू-काश्मीरमधील हल्ल्यांमध्ये सामील असलेल्या चार दहशतवाद्यांचे स्केच बुधवारी जारी करण्यात आले. त्यांची माहिती देणाऱ्यांना 20 लाखांचे बक्षीस देण्याची घोषणाही करण्यात आली. त्यापूर्वी भाविकांच्या बसवर हल्ला करणाऱ्या एका दहशतवाद्याचे स्केच जारी करत पोलिसांनी 20 लाखांचे बक्षीस जाहीर केले होते.