मोदींना खंत तामिळ न शिकल्याची!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘जगातील सर्वात प्राचीन अशी तामिळ भाषा शिकण्यासाठी मी जास्त प्रयत्न करू शकलो नाही, तामिळ शिकलो नाही’, अशी खंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रेडिओवरील ‘मन की बात’ या कार्यक्रमात आज व्यक्त केली. नद्यांचे महत्व, पाणी वाचवण्याची गरज आणि विविध भागातील शेतकऱयांनी केलेल्या कामाबद्दल देशातील नागरिकांशी संवाद साधला.

‘तुम्ही इतकी वर्षे पंतप्रधान आहात. इतकी वर्षे मुख्यमंत्री होतात. तरीही काहीतरी कमतरता राहिली असे तुम्हाला वाटत नाही का?’ असा प्रश्न हैदराबादच्या अपर्णा रेड्डी यांनी पंतप्रधान मोदी यांना विचारला होता. त्याला उत्तर देताना मोदी यांनी तामिळ भाषा शिपू शकलो नाही हीच कमतरता राहिली असे सांगितले.

पाणी वाचवण्यासाठी 100 दिवसांची मोहीम

पावसाचे पाणी साठवण्यासाठी ‘कॅच द रेन’ ही 100 दिवसांची मोहीम राबवली जाणार असल्याची माहिती पंतप्रधान मोदी यांनी या कार्यक्रमात दिली. केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्या वतीने राबवल्या जाणाऱया या मोहिमेचे ब्रीदवाक्य ‘कॅच द रेन, व्हेअर इट फॉल्स, व्हेन इट फॉल्स’ असे आहे. त्याअंतर्गत आपण सर्व मिळून आपल्या आसपासच्या जलस्रोतांची स्वच्छता करूया तसेच जिथे आणि जेव्हा पाऊस पडेल ते पाणी साठवूया असे आवाहन मोदी यांनी केले.

स्वदेशी वस्तूंचा अभिमान बाळगा

आपल्या भाग्याचा फैसला स्वतः करणे हीच खरी आत्मनिर्भरता आहे असे सांगतानाच स्वदेशी वस्तूंचा अभिमान बाळगणे ही आत्मनिर्भरतेची पहिली अट आहे असे पंतप्रधान मोदी म्हणाले. देशातील नागरिक एकमेकांशी जोडले गेले तर ‘आत्मनिर्भर भारत’ ही एक आर्थिक मोहीम न राहता ती राष्ट्रीय चेतना बनेल असे मोदी म्हणाले.