स्वतःला बदला नाहीतर योग्यवेळी बदल होतील!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संसदेत वारंवार दांडी मारणाऱया, वेळेचे भान न राखणाऱया आणि बेजबाबदार वागणाऱया भाजप खासदारांना मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चांगलेच फैलावर घेतले. संसदेत शिस्तीत राहा, वेळेवर या, तुमची पाळी आल्यावरच बोला, स्वतःला बदला, नाहीतर योग्य वेळी बदल होतील, असा गर्भित इशारा मोदींनी भाजप खासदारांना दिला.

भाजपच्या संसदीय गटाची बैठक मंगळवारी झाली. बैठकीत मोदींनी पक्षाच्या सर्व खासदारांना शिस्तीचे डोस पाजले. सध्या सुरू असलेल्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनात विरोधकांनी विविध मुद्दय़ांवरून केंद्र सरकारला चौफेर घेरले आहे. त्या अनुषंगाने मोदींनी खासदारांची ‘शाळा’ घेतली. लहान मुलांसारखे वागू नका. संसदेचे कामकाज आणि बैठकांमध्ये नियमित हजर रहा. लोकांच्या हितासाठी काम करा. तुमच्या बेशिस्तपणामुळे मी त्रस्त आहे. तुम्हाला मुलांप्रमाणे वागणूक देणे हे माझ्यासाठी चांगले नाही. मुलांनाही एकच गोष्ट अनेकदा सांगितली तर त्यांना ते आवडत नाही, अशा शब्दांत समज देतानाच स्वतःला बदला, अन्यथा योग्य वेळी बदल होतील, असा गर्भित इशारा मोदींनी दिला. बैठकीला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, गृहमंत्री अमित शहा, वाणिज्य मंत्री पीयूष गोयल, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी हेसुद्धा उपस्थित होते.