पंतप्रधान मोदींचा दौरा रद्द

958

नागपूरसह विदर्भाला आज पावसाने अक्षरशः झोडपून काढले. मेघगर्जनेसह आलेल्या पावसाने अनेक घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे पूरस्थिती निर्माण झाली. गडचिरोलीमध्ये पर्लकोटा नदीला पूर आल्यामुळे शेकडो गावांचा संपर्क तुटला.  आणखी दोन दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्यामुळे प्रशासनाने सतर्क राहण्याचे आवाहन ग्रामस्थांना केले आहे. दरम्यान नागपूरमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि जागोजागी पाणी साचल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नियोजित नागपूर दौरा रद्द करण्यात आला आहे.

शुक्रवारी दुपारी मेघगर्जनेसह आलेल्या मुसळधार पावसाने नागपूरला धुवून टाकले. तब्बल दीड तास सतत पाऊस पडत असल्यामुळे अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरले होते. नागपूरच्या शंकरनगर भागात कंबरेएवढे पाणी साचले होते तर सीताबर्डी येथील मोरभवन बसस्थानकात पूरस्थिती निर्माण झाली होती. तसेच नागपुरच्या बेसा परिसर, मानेवाडा, हुडकेश्वर या भागात सर्वत्र तळे साचल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते.  याबरोबरच, नागपूर, वर्धा आणि यवतमाळमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.  नागपूरसह अमरावती, वर्धा, यवतमाळ, भंडारा आणि चंद्रपुरात विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. या बरोबरच अकोला, गडचिरोली आणि गोंदिया, वाशीममधील काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

नागपूरवरील जलसंकट सध्या टळले

नागपूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तोतलाडोह धरणातील जलसाठा 43 टक्क्यांवर पोहोचला असून, गेल्या 24 तासांत धरणातील पाणीसाठ्यात 4 टक्के वाढ झाली आहे. यामुळे नागपूरकरांवरचे जलसंकट टळण्याची शक्यता आहे. तर, तोतलाडोह धरणातला पाणीसाठा वाढल्याने शहरवासीयांचे जलसंकट दूर होणार, अशी माहिती नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. तोतलाडोह धरणातील पाणीसाठय़ात वाढ झाल्याची माहिती  बावनकुळे यांनी दिली. तोतलाडोह धरणातील पाणीसाठा वाढल्यामुळे नागपूरकरांवरचे जलसंकट टळणार असल्याचे त्यांनी सांगितले.

निर्धारित दौऱ्यानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या दि. 7 सप्टेंबर रोजी दुपारी 4 वाजता नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचणार होते. तेथून ते सुभाषनगर परिसरातील नागपूर मेट्रोच्या मेट्रो स्टेशनवर  जाऊन हिंगणा ते सीताबर्डी या मार्गावरील मेट्रो रेल्वेला हिरवी झेंडी दाखवणार होते. तेथून त्याच मेट्रोने ते सिताबर्डी येथे येऊन तेथून मानकापूर क्रीडा संकुलात आयोजित जाहीर कार्यक्रमात सहभागी होणार होते.

आपली प्रतिक्रिया द्या