अफवांवर विश्वास ठेवू नका, लस घ्या! पंतप्रधान मोदी यांचे ‘मन की बात’मधून देशवासीयांना आवाहन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 ‘कोरोना लस घेतल्याने मृत्यू होतो अशा अफवा पसरवल्या जात आहेत. त्या अफवांवर विश्वास ठेवू नका. हा आजार एखाद्या बहुरूप्यासारखा आहे. रंग बदलून हल्ला करतो. त्याला रोखायचे आहे. जीव वाचवायचा आहे. देशाला वाचवायचे आहे. त्यामुळे न घाबरता लस घ्या आणि इतरांनाही त्यासाठी प्रोत्साहन द्या’, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला आज केले.

पंतप्रधान मोदी यांनी ‘मन की बात’मधून आज देशातील नागरिकांशी संवाद साधला. आजचा 78 वा भाग होता. पंतप्रधानांनी मध्य प्रदेशच्या बैतूलमधील एका गावातील लोकांशी संवाद साधला. कोरोना लस घेतल्याने मृत्यू होतो अशी चर्चा तुम्ही ऐकली आहे का, असा सवाल किशोरी लाल या ग्रामस्थाने त्यांना केला. त्यावर उत्तर देताना मोदी म्हणाले की, ‘अशा अफवांकडे लक्ष देऊ नका. लस हे आपले शस्त्र आहे. शास्त्रज्ञांनी बरीच मेहनत करून लस बनवली आहे. मी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. माझ्या आईने 100 वर्षे वय असतानाही दोन्ही डोस घेतले आहेत. देशातील 20 कोटींपेक्षा जास्त नागरिकांनी लस घेतली आहे.’

‘कोरोना काळात आदिवासी बांधवांनी गावांमध्ये क्वारंटाइन सेंटर बनवली, कुणालाही उपाशी राहू दिले नाही, शेतीची कामेही थांबू दिली नाहीत आणि दूध-पालेभाज्या शहरांमध्ये रोजच्या रोज पोहचवण्याची काळजीही घेतली. स्वतःसह इतरांनाही सांभाळण्याचे त्यांचे हे काम जगासाठी कधी ना कधी अभ्यासाचा विषय बनेल.’ असे कौतुकोद्गारही मोदी यांनी काढले.