नरेंद्र मोदींची तुलना छत्रपती शिवरायांशी, ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ पुस्तकावरून देशभरात टीकेची झोड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांशी करण्याचा संतापजनक प्रकार भाजपने केला आहे. ‘आज के शिवाजी, नरेंद्र मोदी’ या पुस्तकाचे प्रकाशन भाजपच्या दिल्ली कार्यालयात झाले. या पुस्तकावरून आता प्रचंड गदारोळ उडाला असून भाजपवर देशभरातून टीकेची झोड उठली आहे. अवघ्या महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे.

भाजपचे जय भगवान गोयल यांनी मोदींची तुलना छत्रपती शिवरायांशी करणारे हे पुस्तक लिहिले आहे. भाजपच्या दिल्लीतील कार्यालयात धार्मिक आणि सांस्कृतिक संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या संमेलनात या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. विशेष म्हणजे यावेळी प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी, प्रभारी श्याम जाजू, माजी खासदार महेश गिरी आदी नेते उपस्थित होते.

गोयल यांनी या पुस्तक प्रकाशनाची बातमी आणि छायाचित्रे सोशल मीडियावर प्रसिद्ध करताच देशभरातून संताप व्यक्त होऊ लागला. मोदींची तुलना छत्रपती शिवरायांशी करण्याची भाजपची हिंमत होतेच कशी, असा सवाल सोशल मीडियावर विचारला जाऊ लागला. भाजपवर देशभरातून टीकेची झोड उठू लागली असून या पुस्तकावर बंदी घालावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. दिल्ली निवडणुकीत भाजप सपाटून मार खाणार असे निवडणूकपूर्व सर्वेक्षण सांगते. त्यामुळे दिल्ली जिंकण्यासाठी भाजप वाट्टेल त्या थराला जात असल्याचेच या पुस्तकावरून दिसते, अशी प्रतिक्रियाही एकाने सोशल मीडियावर दिली आहे.

राजकीय आसुड कडाडले
शिवाजी महाराज हे एकमेवाद्वितीय आहेत. त्यांच्याशी तुलना होऊ शकणारा माणूस अजून जन्माला आलेला नाही आणि येणारही नाही अशा शब्दांत राजकीय आसुड कडाडले आहेत. जगाच्या अंतापर्यंत दुसरे छत्रपती शिवाजी महाराज होणे नाही. मोदींनी स्वतःला आरशात बघावे, असे गृहनिर्माणमंत्री व राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे, तर काँग्रेसचे माजी खासदार राजीव सातव यांनी मोदींकडे शिवाजी महाराजांचा एकतरी गुण आहे का, असा खोचक सवाल विचारला आहे. शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांनीही या पुस्तकावर आणि लेखकावर खरमरीत टीका केली असून हे जय भगवान गोयल म्हणजे तोच माणूस ज्याने दिल्लीतील महाराष्ट्र सदनावर हल्ला केला होता आणि छत्रपती शिवरायांचा अपमान केला होता, याची आठवण खासदार राऊत यांनी भाजपला करून दिली आहे. ‘शाब्बास भाजप’ अशा शालजोडीतील रट्टाही खासदार राऊत यांनी भाजपला हाणला आहे. भाजपमध्ये शिरलेल्या छत्रपतींच्या वंशजांना ही तुलना मान्य आहे का, असा सवाल खासदार राऊत यांनी उदयनराजे, शिवेंद्रराजे आणि कोल्हापूरचे संभाजीराजे यांना केला आहे.

पुस्तकावर बंदी घाला – खासदार संभाजी राजे
भाजपचे खासदार संभाजी राजे यांनी त्या पुस्तकावर तत्काळ बंदी घालण्याची मागणी केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कुणाशीही करणे खपवून घेतले जाणार नाही, असेही संभाजीराजे म्हणाले. तर उदयनराजे म्हणाले, त्या पुस्तकाबद्दल मी माहिती घेईन आणि नंतरच बोलेन.

…नाहीतर गाठ महाराष्ट्राशी आहे
सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनीही भाजपवर टीका केली असून भाजप नेत्यांनी मराठीजनाच्या भावना दुखावल्या आहेत. युगपुरुष छत्रपती शिवरायांची बरोबरी कोणीही करू शकत नाही. हा अट्टहास करू पाहणाऱयांना महाराष्ट्र माफ करणार नाही, असे मुंडे म्हणाले. तर जलसंपदामंत्री जयंत पाटील म्हणाले, सह्याद्रीएवढय़ा माझ्या राजाची तुलना कोणाशीच होऊ शकत नाही हे लक्षात ठेवा. नाहीतर गाठ महाराष्ट्राशी आहे.

काँग्रेसने केली पोलिसात तक्रार
‘आज के शिवाजी-नरेंद्र मोदी’ या पुस्तकाविषयी काँग्रेसकडून पोलिसात तक्रार करण्यात आली आहे. काँग्रेस नेते अतुल लोंढे यांनी नागपूर येथील नंदनवन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. शिवाजी महाराज हे कोटय़वधी जनतेचे आराध्य दैवत आहेत. त्यांची तुलना पंतप्रधान मोदी तसेच अन्य कुणाशीही करणे हा शिवप्रेमी जनतेच्या भावनांचा अवमान असल्याचे या तक्रारीत नमूद करण्यात आली असून पुस्तकावर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

राजकीय तडाखे
– भाजपमध्ये शिरलेल्या छत्रपतींच्या वंशजांना ही तुलना मान्य आहे का? शिवसेनेचा सवाल
– तुलना करण्याआधी नरेंद्र मोदींनी जरा आरशात बघावे, राष्ट्रवादीचा सल्ला
– मोदींकडे शिवाजी महाराजांचा एकतरी गुण आहे का? काँग्रेसचा सवाल