जगभरात हिंदुस्थानबद्दल सन्मान आणि आदर वाढला – पंतप्रधान नरेंद्र मोदी

715

2014 मध्ये आपण अमेरिका आणि संयुक्त राष्ट्रांमध्ये गेलो होतो आणि आताही जाऊन आलो. या दोन्ही भेटीतला फरक स्पष्टपणे दिसून आला. हिंदुस्थानकडे पाहण्याचा जगाचा दृष्टीकोन बदलला आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. जगभरातून हिंदुस्थानबाबत सन्मान आणि आदर वाढला आहे, हे सर्व 130 कोटी देशवासीयांमुळे शक्य झाल्याचे ते म्हणाले. अमेरिकेहून मायदेशी परतल्यावर मोदी यांचे पालन विमानतळावर जल्लोषात स्वागत करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. आपल्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणावर उपस्थित असलेल्या जनतेचेही त्यांनी आभार मानले. यावेळी त्यांनी तीन वर्षापूर्वी करण्यात आलेल्या सर्जिकल स्ट्राईकच्या आठवणींनाही उजाळा दिला.

तीन वर्षांपूर्वी याच दिवशी म्हणजेच 28 सप्टेंबरच्या रात्री हिंदुस्थानी लष्कराच्या वीर जवानांनी सर्जिकल स्ट्राईक केला होता. लष्कराच्या जवानांनी देशाची शान राखली होती. त्यांनी जगाला हिंदुस्थानची ताकद दाखवून दिली होती. त्या रात्री एक क्षणही आपण झोपू शकलो नाही. सुवर्णाक्षरांनी इतिहास घडवणाऱ्या शूरवीर जवानांना आपण प्रणाम करतो, असे ते म्हणाले. सर्जिकल स्ट्राईक करून लष्कराच्या जवानांनी जे शौर्य दाखवले त्याला आपण वंदन करतो. देशवासी जवानांचे हे साहस कधीही विसरणार नाही, असे ते म्हणाले.

आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना नवरात्र उत्सवाच्याही शुभेच्छा दिल्या. तसेच अमेरिकेत राहणाऱ्या सगळ्या हिंदुस्थानींचेही त्यांनी आभार मानले. न्यूयॉर्क आणि संयुक्त राष्ट्र परिषदेत जगभरातल्या नेत्यांसोबत आपल्या भेटीगाठी झाल्या. ‘हाऊडी मोदी’ या कार्यक्रमाची अमेरिकेतच नाही तर जगभरातल्या नेत्यांमध्ये चर्चा होत आहे, असे त्यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या