मोदी यांनी मला भेटण्याची विनंती केली; ट्रम्प यांचा पुन्हा नवा दावा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा हिंदुस्थानचे पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत एक विधान केले आहे. पंतप्रधान मोदींनी मला एकदा भेटण्याची विनंती केली असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला आहे. यावेळी आयात शुल्क, तेल आयात आणि अपाचे हेलिकॉप्टर खरेदीबद्दलही चर्चा करायची असल्याचे मोदी म्हणाले होते.

मंगळवारी हाऊस रिपब्लिकन पार्टी मेंबर रिट्रीटमध्ये बोलताना त्यांनी मोदींबद्दल भाष्य केले. पंतप्रधान मोदी मला म्हणाले की, मी तुम्हाला भेटू शकतो का? यावर मी हो असं म्हणालो होतो, असे ट्रम्प यांनी सांगितले होते. यावेळी हिंदुस्थान आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी असलेल्या संबंधांवर भाष्य केले. आमच्यात चांगले संबंध आहेत. पण सध्या आमच्यात काही मतभेद आहेत, असे ट्रम्प म्हणाले.

मैत्रीचे संबंध असूनही, व्यापार आणि टॅरिफच्या मुद्द्यावरून पंतप्रधान मोदी आपल्यावर नाराज असल्याचे ट्रम्प यांनी यावेळी नमूद केले. हिंदूस्थाने रशियाकडून होणारी तेलाची आयात पूर्णपणे बंद न केल्यामुळे अमेरिकेने हिंदूस्थानी वस्तूंवर मोठे शुल्क लादले आहे. आम्ही सीमाशुल्कामुळे श्रीमंत होत आहोत आणि लवकरच 650 अब्ज डॉलर्स देशात येतील, असे ट्रम्प यांनी सांगितले.

रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या देशांवर दबाव वाढवला आहे. हिंदुस्थानने रशियाकडून होणारी तेलाची आयात कमी केली असली, तरी ट्रम्प यांनी हिंदुस्थानी वस्तूंवर 500 टक्के टॅरिफ लागू केले आहे. रशियासोबत ऊर्जा व्यापार सुरू ठेवल्यास हिंदुस्थानला भविष्यात आणखी मोठ्या कारवाईला सामोरे जावे लागू शकते, असा इशाराही त्यांनी पुन्हा एकदा दिला.