
राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराचे आता अखेरचे दिवस राहिले आहेत. येत्या 21 तारखेला होणाऱ्या मतदानासाठी प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा राज्यात ठाण मांडून आहेत. गुरुवारी नरेंद्र मोदी यांनी परळीमध्ये सभा घेतली. यानंतर साताऱ्यात दाखल झाले.
सातारामध्ये होत असणाऱ्या लोकसभा पोटनिवडणुकीत उदयनराजे भोसले आणि विधानसभा निवडणुकीत शिवेंद्रराजे भोसले भाजपकडून मैदानात आहे. या दोघांच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी साताऱ्यात पोहोचले. या ठिकाणी त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. सातारा भाजपकडून त्यांना चांदीचे कमळ भेट देण्यात आले. तसेच उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले यांनी मोदींना पगडी घातली आणि तलवार देऊन त्यांचे स्वागत केले. मोदींनीही म्यानातून तलवार काढत उंचावत उपस्थितांना अभिवादन केले.
























































