
सामना ऑनलाईन । कलबुर्गी
कर्नाटकमधील कलबुर्गीमध्ये विविध योजनांची पायाभरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते बुधवारी करण्यात आली. त्यावेळी त्यांनी विरोधकांवर कडाडून टीका केली. देशातील सव्वाशे कोटी जनता आपल्यासोबत आहे. जनतेने दिलेल्या पाठबळामुळेच मी विरोधकांना किंवा पाकिस्तानला घाबरत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. केंद्रात आपले सरकार असेपर्यंत चोरांचे दुकान बंद राहील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. विरोधी पक्ष फक्त मोदींना हटवण्यासाठी एकत्र येत आहेत. मात्र, आपण दहशतवाद आणि भ्रष्टाचार मिटवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले.
पंतप्रधानांनी अनेक विकास कामांची पायभरणी केली. त्यानंतर केंद्र सरकारच्या आयुष्मान योजनेसह इतर योजनांचीही त्यांनी जनतेला माहिती दिली. केंद्रात आपले सरकार असेपर्यंत आपण शेतकरी आणि गरीबांसाठी काम करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आपले सरकार असेपर्यंत चोरांची आणि भ्रष्टाचार करण्याऱ्यांची दुकाने बंद राहतील असेही ते म्हणाले. विरोधी पक्षांना भ्रष्टाचारी सरकार हवे आहे. मात्र, आपण भ्रष्टाचार होऊ देणार असे त्यांनी ठामपणे सांगितले. भ्रष्टाचार करायला मोकळे रान मिळावे यासाठी त्यांनी मजबूर सरकार हवे आहे. मात्र, आपले मजबूत सरकार आहे. कर्नाटकात मजबूर सरकार असल्याने येथील परिस्थिती काय आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. येथील सरकार भ्रष्टाचार करण्यात गुंतली आहे. आघाडीतील नेते एकमेकांचे पाय खेचत आहे. तसेच केंद्राच्या गरीबांसाठी असलेल्या योजनांना आडकाठी करत त्या योजना राज्यात लागू करत नसल्याचा आरोपही मोदी यांनी केला.
तुम्ही मजबूर सरकार निवडून एक चूक केली आहे. तुम्हांला चूक सुधारण्यासाठी संधी मिळाली आहे. आता तुमच्या हितासाठी काम करणारे मजबूत सरकार निवडून द्या असेही आवाहनही त्यांनी केले. या आधीच्या सरकारने लागू केलेल्या योजनेमध्ये 8 कोटी बनावट लाभार्थी होते. ते देशाला लुटण्याचे काम करत होते. आमचे सरकार आल्यानंतर बोगस लाभार्थी करत असलेली देशाची लूट थांबवण्यात आली आहे. आता खऱ्या लाभर्थ्यांनाच योजनांचा लाभ मिळत असल्याचे ते म्हणाले. विरोधकांची भ्रष्टाचाराची कुरणे आम्ही बंद केली आहेत. त्यामुळे विरोधक आपल्याविरोधात एकवटत असल्याचे ते म्हणाले. मात्र, देशातील जनता आपल्यासोबत असल्याने आपण कोणालाही घाबरत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.



























































