साध्वी प्रज्ञासिंह यांना माफ करू शकणार नाही- पंतप्रधान मोदी

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

महात्मा गांधींची हत्या करणारा नथुराम गोडसे देशभक्त असल्याचे वक्तव्य भाजपच्या साध्वी प्रज्ञासिंह यांनी केले होते. त्यांच्या या विधानानंतर मोठा वादंग निर्माण झाला आहे. या वक्तव्याचा मुद्दा लावून धरत प्रज्ञासिंह आणि भाजपवर विरोधी पक्षांनी टीकेची झोड उठवली आहे. भाजप अध्यक्ष अमित शहा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही कठोर शब्दांत या वक्तव्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. साध्वी प्रज्ञासिंह आणि इतर नेते नथुराम गोडसे आणि महात्मा गांधी यांच्याबाबत करत असलेली विधाने दुर्दैवी आहेत. या वक्तव्याबाबत साध्वी प्रज्ञासिंह यांनी माफी मागितली असली तरी त्यांना मनापासून माफ करू शकणार नाही, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.

साध्वी प्रज्ञासिंह यांनी केलेल्या विधानाशी भाजपचा संबंध नसल्याचे स्पष्ट करत भाजपने या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे. विरोधकांकडून सतत होणाऱ्या टीकेमुळे भाजप अध्यक्ष अमित शहा यांनीही हे वक्तव्य दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे. तसेच हा मुद्दा पक्षाच्या शिस्तपालन समितीकडे पाठवल्याचे स्पष्ट केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या वक्तव्याबाबत कठोर शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. महात्मा गांधी आणि नथुराम गोडसे यांच्याबाबत करण्यात येणारी वक्तव्ये खेदजनक आहेत. सुसंस्कृत समाजात अशा वक्तव्यांना काहीही स्थान नाही. यापुढे अशी विधाने करताना कोणालाही 100 वेळा विचार करावा लागेल. साध्वी प्रज्ञासिंह यांनी माफी मागितली असली तरी आपण त्यांना मनापासून माफ करू शकणार नाही, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.

साध्वी प्रज्ञासिंह यांच्या वक्तव्यानंतर विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. त्यामुळे साध्वींनी माफी मागितली आहे. तसेच या विधानाशी पक्षाचा संबंध नाही, असे भाजपने स्पष्ट केले आहे. हा वाद शांत होत नाही, तोच केंद्रीयमंत्री अनंत हेगडे यांनी साध्वी प्रज्ञासिंग यांच्या विधानाचे समर्थन केले. तसेच भाजप खासदार नलीन कटील यांनीही वादग्रस्त विधान केले आहे. या विधानांची पक्षाने गंभीर दखल घेत ती पक्षाच्या शिस्तपालन समितीकडे पाठवली आहेत. समिती या नेत्यांकडून उत्तरे मागवणार असून 10 दिवसांत अहवाल सादर करणार आहे.