
कर्नाटकात काँग्रेसने 136 पेक्षा जास्त जागांवर विजय मिळवत राज्यात एकहाती सत्ता मिळवली आहे. त्यामुळे आज देशभर काँग्रेसच्या विजयाचा बोलबाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील काँग्रेसला विजयाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधानांनी ट्विटर करत काँग्रेसला शुभेच्छा दिल्या व भाजप कार्यकर्त्यांचे आभार मानले.
”कर्नाटक विधानसभा निवडणूकीत काँग्रेसने मिळवलेल्या विजयासाठी त्यांचे अभिनंदन. जनतेची कामं पूर्ण करण्यासाठी माझ्या त्यांना शुभेच्छा” असे ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.
तसेच त्यांनी आणखी एक ट्विट करत कर्नाटकातील भाजप कार्यकर्त्यांचे व भाजपला पाठिंबा देणाऱ्यांचे देखील आभार मानले. ”कर्नाटक निवडणूकीत आम्हाला पाठिंबा देणाऱ्यांचे मी आभार मानतो. भाजप कार्यकर्त्यांनी खूप मेहनत घेतली. येत्या काळात आपण कर्नाटकच्या जनतेची अधिक चांगल्या प्रकारे सेवा करू”, असे नरेंद्र मोदी यांनी ट्विटमधून म्हटले आहे.
























































