रात्री 8 वाजता जाहीर करायला ‘लॉकडाऊन’ म्हणजे काय ‘नोटबंदी’ नव्हे, राष्ट्रवादीची टीका

2688

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी रात्रीपासून 21 दिवसांसाठी लॉकडाऊन जाहीर केले आहे. मात्र जीवनावश्यक वस्तू संदर्भात घोषणा न केल्याने जनतेला जास्त संभ्रमावस्थेत ठेवल्याची टीका करत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तसेच लॉकडाऊन रात्री 8 वाजता जाहीर करायला ‘लॉकडाऊन’ म्हणजे काय नोटबंदी नव्हे, सकाळी या गोष्टी जाहीर करून जनतेला तयारीसाठी वेळ द्यायला हवा होता, अशी खरमरीत टीकाही त्यांनी यावेळी केली.

‘जीवनावश्यक गोष्टींच्या बाबत पंतप्रधानांच्या घोषणेमध्ये स्पष्टता अत्यंत आवश्यक होती. देश एका संकटाला तोंड देत असताना देशाच्या सर्वोच्च नेतृत्वाने अपुरी माहिती दिल्याने, देशात अनागोंदी निर्माण झाली आहे’, असेही ते म्हणाले. असे असले तरी, महाराष्ट्रातील जनतेने घाबरून जाण्याचे कारण नाही असेही पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

‘महाराष्ट्रात गेले दोन दिवस लॉकडाऊन सुरूच आहे. पुढील काळातही जनतेच्या सर्व जीवनावश्यक सेवा सुरू राहतील. हे सरकार जनतेला जीवनावश्यक सुविधांच्या बाबतीत कोणताही त्रास होऊ नये यासाठी कटिबद्ध आहे’, असे आश्वासनही त्यांनी दिले.

आपली प्रतिक्रिया द्या