
आंबिल ओढा परिसरातील घरे आणि झोपडपट्टय़ांवर महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी कारवाईला नागरिकांनी तीव्र विरोध केला. काही नागरिकांनी रॉकेल अंगावर ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने परिस्थिती तणावपूर्ण झाली होती. नागरिक आणि पोलिसांमध्ये कारवाईच्या ठिकाणी झटापट झाली. नागरिकांच्या प्रचंड विरोधानंतरही तणावाच्या वातावरणात काही घरांवर प्रचंड पोलीस बंदोबस्तात पालिकेने कारवाई केली. बिल्डरसाठी ही जागा रिकामी कsली जात असल्याचा आरोप रहिवाशांनी केला. या कारवाईवरून विरोधी पक्षांनी सत्ताधारी भाजपवर टीकेची झोड उठविली.
कारवाईला स्थगिती
घरे पाडण्याच्या कारवाईला आज नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी स्थगिती देण्याचे निर्देश महापालिका प्रशासनाला दिले. याबाबत उपमुख्यमंत्री तथा पुणे जिह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करुन हे निर्देश दिल्याची माहिती शिंदे यांनी यावेळी दिली. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱहे यांच्या विशेष प्रयत्नाने आज दूरदृष्य प्रणालीद्वारे तातडीची बैठक घेण्यात आली. या तोडकामाला न्यायालयाने ही 7 जुलैपर्यंत स्थगिती दिली असून हा प्रश्न शासन स्तरावर प्रश्न सोडवावा असे आदेश दिल्याची माहिती डॉ. निलम गोऱहे यांनी देऊन न्यायालय व शासनाचे ही आभार मानले. या प्रकल्पाविषयी पाच जणांची समितीही नेमण्यात आल्याची माहिती मनपा आयुक्त विक्रम कुमार यांनी यावेळी दिली.


























































