पीएमसी घोटाळा प्रकरण, 40 मालमत्तांची किंमत ठरवण्यासाठी नेमली कंपनी

355

पंजाब-महाराष्ट्र सहकारी बँकेकडे गहाण ठेवलेल्या 40 मालमत्तांची किंमत ठरवण्यासाठी एचडीआयएलने आंतरराष्ट्रीय कंपनी नेमली आहे. खातेदारांच्या पैशांची परतफेड करण्यासाठी या मालमत्ता विकण्याबाबत एचडीआयएल पीएमसी बँकेशी चर्चा करणार आहे. त्यामुळे गेले काही दिवस चिंतेत असलेल्या बँकेच्या खातेदारांना मोठा दिलासा मिळणार आहे.

एचडीआयएलने पीएमसी बँकेकडून 2200 कोटींचे कर्ज घेतले होते. व्याज पकडून हे कर्ज 4500 कोटींच्या घरात गेले आहे. या कर्जाची परतफेड न केल्यामुळे एचडीआयएलचे प्रवर्तक राकेश आणि सारंग वाधवान यांच्या हातात मुंबई पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या आहेत. सध्या हे दोघे ईडीच्या कोठडीत असून एचडीआयएलने कर्जाची वसुली करण्यासाठी 40 मालमत्ता विकण्याचा प्रस्ताव बँकेपुढे ठेवला आहे. संबंधित मालमत्तांची किंमत ठरवण्याचे काम ‘नाईट फ्रँक’ या आंतरराष्ट्रीय कंपनीकडे दिले आहे. ही कंपनी पुढील दहा दिवसांत आपला अहवाल देणार असून त्याआधारे एचडीआयएल मालमत्तांच्या विक्रीबाबत बँकेशी चर्चा करणार आहे.

  • एचडीआयएलने 2010 ते 2018 या कालावधीत कर्ज घेण्यासाठी वसई, ठाणे, नवी मुंबई आणि केरळ येथील 40 मालमत्ता पीएमसी बँकेकडे गहाण ठेवल्या आहेत.
  • 18 मालमत्तांची किंमत जवळपास 3 हजार कोटी आहे, तर इतर 22 मालमत्ता 4 हजार कोटींच्या आहेत. आंतरराष्ट्रीय कंपनीने मूल्यांकन केल्यानंतरच या मालमत्तांची नेमकी किंमत स्पष्ट होणार आहे.
आपली प्रतिक्रिया द्या