निघ इथून! जामिनावर सुटलेल्या चोक्सीचे अँटीग्वात निषेधाने स्वागत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

डोमिनिका उच्च न्यायालयातून मेहुल चोक्सीला जामीन मिळाल्यानंतर खासगी विमानाने अँटीग्वात आला आहे. परंतु अँटीग्वातील नागरिकांनी निषेध करून त्याचे स्वागत केले आहे. तसेच आपल्या मायदेशात परत जा असेही काहींनी त्याला सुनावले आहे.

मेहुल चोक्सी बेकायदेशीरिया डोमिनिका देशात प्रवेश करत होता. तेव्हा पोलिसांनी त्याला पकडले आणि त्याची रवानगी तुरुंगात केली होती. अखेर चोक्सीला या प्रकरणात जामीन मिळाला असून त्याची सुटका करण्यात आली आहे. बुधवारी तो अँटीग्वात आपल्या खासगी विमानाने आला तेव्हा, निषेधाच्या सुरात अनेक नागरिकांनी त्याचे स्वागत केले.

अँटीग्वातील वेबसाईट antiguanewsroom.com ने याबाबत वृत्त दिले आहे. काहींनी त्याला इथून निघून जा, हिंदुस्थान तुला बोलवत आहे असे म्हटले आहे. तर एकाने कुठलेही शुल्क न देता आपल्या आवडत्या ठिकाणी निघून जा तसेच काहींनी वेलकम होम म्हणून चोक्सीचे स्वागत केले आहे.

पंजाब नॅशनल बँकेला 14 हजार 500 कोटी रुपयांचा चुना लावून फरार झालेला आरोपी मेहुल चोक्सीला डोमिनिका न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. चोक्सीला अँटिग्वा येथे वैद्यकीय उपचारासाठी जाण्याची परवानगी देखील न्यायालयाकडून देण्यात आली आहे. न्यायालयात सुनावणी दरम्यान, मेहुल चोक्सी रुग्णालयाच्या खाटेवरूनच व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे हजर झाला होता.

न्यायालयाने म्हटले आहे की, डोमिनिकामध्ये बेकायदेशीर प्रवेशाच्या प्रकरणात त्याला परत जावे लागेल. उपचारासाठी त्याला न्यायालयाने अँटिग्वा येथे जाण्याची परवानगी दिली आहे. जूनच्या शेवटच्या आठवड्यातही मेहुल चोक्सी प्रकरणी न्यायालयात सुनावणी झाली होती. त्यावेळीही प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्याचा न्यायालयात हजर होता आले नव्हते.

मेहुल चोक्सीने पंजाब नॅशनल बँकेत घोटाळा केल्यानंतर 2018 मध्ये हिंदुस्थानातून पळ काढला होता. अनेक महिने त्याचा शोध घेतल्यानंतर अँटीगुआ देशातील बारबुडा येथे वास्तव्याला असून त्याने 2017 मध्ये त्या देशाचे नागरिकत्व स्वीकारल्याची बाब समोर आली होती. त्यानंतर सीबीआय आणि ईडीने कारवाईचा फास आवळत त्याला हिंदुस्थानात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र आपली प्रकृती ठीक नसल्याचे कारण देत त्याने परतण्यास नकार दिला आहे. त्यामुळे त्याच्यावर खटला सुरू आहे.