सुसाट पोलादपूरजवळ कारची कंटेनरला धडक; दोन महिला ठार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भरधाव कारने उभ्या असलेल्या कंटेनरला जोरदार धडक दिल्याची घटना आज दुपारी मुंबई-गोवा महामार्गावरील पोलादपूरजवळ घडली. हा अपघात इतका भयंकर होता की यात दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला. सुवर्णा मार्केड आणि अनुक्षी मार्केड अशी मृतांची नावे आहेत. एक जण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अनिल मार्केड हे कुटुंबासह दापोलीच्या दिशेने जात होते. ते मुंबई-गोवा महामार्गावरील पोलादपूरच्या बालाजी हॉटेलजवळ आले असता गाडीवरील त्यांचे नियंत्रण सुटले आणि भरधाव कार रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटेनरला जाऊन धडकली. या अपघातात कारचा अक्षरशः चेंदामेंदा झाला असून सुवर्णा मार्केड व अनुक्षी मार्केड यांचा जागीच मृत्यू झाला, तर अनिल मार्केड यांना पुढील उपचारासाठी माणगावमध्ये हलवण्यात आले आहेत. चिन्मय याच्यावर महाडमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलादपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जेसीबीच्या सहाय्याने अपघातग्रस्त कार बाजूला करण्यात आली.