
दैनंदिन त्रासातून सुटका करत रविवारची सुट्टी आरोग्य व आनंददायी व्हावी याकरिता मुंबई पोलिसांनी नागरिकांसाठी खास ‘संडेस्ट्रीट’ ही संकल्पना आणली आहे. रविवारपासून हा उपक्रम सुरू होणार असल्याने यात सहभागी होणाऱयांसाठी पोलिसांनी काही सूचना केल्या असून त्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
संडेस्ट्रीटमध्ये नागरिकांना चालणे, धावण्याबरोबर स्केटिंग, योगा, सायकलिंग, मनोरंजनाचे कार्यक्रम करण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे रोजच्या कटकटीतून विरंगुळा व त्यातून तणावमुक्तीसाठी नागरिकांनी संडेस्ट्रीटमध्ये सहभागी व्हावे, असे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी आवाहन केले आहे.
याव्यतिरिक्त कार्यक्रमस्थळी येण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्यास सांगितले असून कोविड नियमांचे तसेच पोलिसांकडून देण्यात येणाऱया सूचनांचे पालन करावे. कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही याची सर्व नागरिकांनी काळजी घेण्याबाबत पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
येत्या रविवारी पहाटे 6 ते 10 या वेळेत शहरातील मरीन ड्राइव्ह येथील दोराभाई टाटा रोड, विक्रोळी येथील ईस्टर्न एक्प्रेस हायवेवरील ब्रिजखाली, मुलुंड येथील तानसा पाइपलाइन, गोरेगाव येथील माइंड स्पेसमागील रस्ता, डी. एन. नगर येथील लोखंडवाला मार्ग आणि वांद्रे येथील कार्टर रोड हे मार्ग एकेरी अथवा वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करून त्या मार्गांवर नागरिकांना योगा, सायकलिंग, स्केटिंग, सांस्कृतिक खेळ यांसारखे कार्यक्रम राबवून त्यांचा आनंद लुटता येणार आहे.
- राजकीय व धार्मिक कार्यक्रम करू नका
- मद्यपान, धूम्रपानास सक्त मनाई असेल
- व्यावसायिक जाहिरातबाजी करू नका
- ध्वनिक्षेपक वापरण्यावर मनाई असणार आहे
- परिसरात स्वच्छता ठेवणे ही प्रत्येकाची जबाबदारी असेल
सहभागी होताय, पण लक्षात राहू द्या
संडेस्ट्रीटमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱया नागरिकांनी काय करू नये याबाबत पोलिसांनी सूचना केल्या असून त्याचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.






























































