
महापालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्यापासून समाजमाध्यमांमधून आक्षेपार्ह व धार्मिक तेढ निर्माण होईल अशा प्रसारित होणाऱ्या व्हिडीओ लिंक्सना महाराष्ट्र सायबर पोलिसांनी टार्गेट केले आहे. आतापर्यंत असे 120 व्हिडीओ लिंक्स शोधून ते हटविण्याबाबत विविध समाजमाध्यम प्लॅटफॉर्म्सना नोटीस बजावण्यात आल्या आहेत.
आचारसंहिता लागू झाल्यापासून निवडणुकीचे वातावरण तापत चालले आहे. टीकाटिप्पणी, आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत. निवडणुकांमध्ये हे प्रकार सर्रास होत असले तरी काही समाजपंटक धार्मिक तेढ निर्माण होईल, वादविवाद होतील, दोन गटांत हाणामारी होईल अशा आक्षेपार्ह व्हिडीओ लिंक्स समाजमाध्यांतून पसरविण्याचे कटकारस्थान करीत आहेत. हा धोका आधीच ओळखून महाराष्ट्र सायबर पोलिसांनी व्हॉट्सअॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम, एक्स या समाजमाध्यमांवर करडी नजर ठेवण्यास सुरू केली. आतापर्यंत 120 आक्षेपार्ह व्हिडीओ लिंक्स शोधून त्या त्वरित हटविण्यात याव्यात याकरिता सायबर पोलिसांकडून संबंधित समाजमाध्यमांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
त्या लिंक्स हटविण्याचे आवाहन
वेबिन, मल्टिगो आदी टूल्सच्या माध्यमातून महाराष्ट्र सायबर पोलीस समाजमाध्यमांवरील आक्षेपार्ह व्हिडीओ लिंक्स शोधायचे काम करत आहेत. तसेच त्या लिंक्स हटविण्याबाबत नोटिसीद्वारे पोलीस आवाहन करीत आहेत. 20 जणांची टीम 24 तास आक्षेपार्ह व्हिडीओ लिंक्सना वेळीच रोखण्याचे काम करत आहेत. आक्षेपार्ह लिंक्सबाबत नागरिकांनी तक्रार द्यावी, असे आवाहन सायबर पोलिसांकडून करण्यात आले आहे.






























































