लोकल प्रवासात वृद्ध महिलांचे दागिने चोरणारी तरुणी गजाआड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

लोकलने प्रवास करणाऱ्या वृद्ध महिलांना टार्गेट करून त्यांचे दागिने शिताफीने चोरणाऱ्या सराईत चोर महिलेला रेल्वे क्राइम ब्रँचच्या कल्याण युनिटने अटक केली. त्या महिलेने केलेल्या पाच गुह्यांची उकल करीत पोलिसांनी ३ लाख ५८ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत.

डोंबिवली रेल्वे स्थानकात वृद्ध महिलांना लक्ष्य करून त्यांचे दागिने चोरीला जाण्याचे प्रकार वाढत होते. याची गंभीर दखल घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष धनवटे यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण युनिटचे प्रमुख एपीआय किरण मतकर तसेच शिवाजी पाटील, शंकर परदेशी, प्रदीप नागवेकर, रणजित रासकर, गणेश गावडे, महेंद्र कर्डिले, वैभव जाधव, विमल नागरगोजे आदींच्या पथकाने आरोपीचा शोध सुरू केला. वृद्ध महिलांच्या पर्समधील दागिने चोरणारी एक महिला असल्याचे स्पष्ट होताच पोलिसांनी खबऱ्यांना कामाला लावले. तसेच सीसीटीव्ही फुटेज तपासून शोध सुरू केला. तेव्हा वडाळय़ाच्या आनंदवाडी येथे राहणारी ती महिला चोर असून तिचे नाव त्रिशला भालेराव असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार पोलिसांनी वडाळा गाठून तिच्या घरावर धडक दिली, पण ती येथे राहत नसून जुन्या अंबरनाथ गावात राहत असल्याचे तिच्या वडिलांनी सांगितले. मग पोलिसांनी अंबरनाथ गाठून त्रिशला हिला ताब्यात घेतले. डोंबिवली रेल्वे पोलिसांत दाखल चोरीचे पाच गुन्हे केल्याचा कबुली तिने दिली. मग त्या पाचही गुह्यांचा उकल करीत पोलिसांनी चोरीचे १३०ग्रॅम वजनाचे साडेतीन लाखांचे दागिने हस्तगत केले.

लुटमार होते, दागिने काढून ठेवा

प्रवासात त्रिशला वृद्ध महिलांना हेरायची. त्यांच्याकडे पिण्यासाठी पाणी मागून विनाकारण ओळख वाढवायची. मग लोकलला गर्दी आहे, गर्दीत दागिने चोरीचे प्रकार घडतात त्यामुळे तुमचे दागिने पर्समध्ये काढून ठेवा असे त्यांना सांगायची. घाबरून वृद्ध महिला त्यांचे दागिने पर्समध्ये काढून ठेवायच्या. मग त्या महिला लोकलमध्ये चढत किंवा उतरत असताना शिताफीने त्यांच्या पर्सची चेन खोलून त्रिशला त्यांचे दागिने चोरायची. अशा प्रकारे तिने पाच गुन्हे केले होते.